पुरंदर, दि. ४ जून २०२०: सासवड ता.पुरंदर येथे बांधकाम सुरू असलेल्या एका घरा मध्ये एक अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घरातील एका लोखंडी हुक्कला फाशी घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे. काल सायंकाळी उशिरा याबाबतची माहिती सासवड पोलिसांना देण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सतीश विश्वास गरुड यांच्या घराचे बांधकाम सासवड पोलिस स्टेशन हद्दीत गिरमे वस्ती, सर्वे नंबर ८४ येथे चालू होते. परंतू कामगाराअभावी त्यांच्या घराचे बांधकाम सध्या बंद करण्यात आले होते.
काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्या बांधकामाजवळ राहणाऱ्या लोकांनी अर्धवट बांधकामाच्या ठिकाणी कसलातरी वास येत असल्याचे सांगितल्याने त्याठिकाणी जाऊन पाहिले असता घराच्या एका खोलीत छताच्या मध्यभागातील लोखंडी हुकला वायरचा फास लावून कोणीतरी अनोळखी पुरुष (वय अंदाजे ५० ते ५५ ) हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याची बॉडी कुजलेली असून चेहरा ओळखता येण्यासारखा नाही. त्याच्या अंगामध्ये गुलाबी रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे.
मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केली असता मयत व्यक्तीने अंदाजे पाच ते सहा दिवसांपूर्वी फाशी घेतल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने सासवड पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर मयताची ओळख पटविण्यासाठी अधिक तपास सासवड पोलिस करीत आहोत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे