सोलापूर, दि. ११ जून २०२०: उजनी धरणातून सोलापूरला पिण्यासाठी भीमा नदीतून पाणी सोडण्यात आले असून सोलापूरला पाणी लवकर पोहोचावे या उद्देशाने जिल्हाधिकारी , सोलापूर यांनी भीमा नदीवरील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करावा असा आदेश दिला. चार दिवस झाले वीजपुरवठा बंद केल्यामुळे पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे. भीमा नदी पात्रात पाणी भरून वाहत आहे मात्र विद्युत पुरवठा बंद केला आहे. नदीला पाणी नसल्यावर कुणी पाणी देता का पाणी, म्हणणाऱ्या
शेतक-यावर आज लाईट देता का लाईट म्हणण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून कलिंगड, खरबूज, केळी, पपई असे अनेक पिके शेतात घेतलेली होती. कोरोना सारख्या महाभयंकर संकटाला तोंड देण्यासाठी शासनाने १००% लॉकडाऊन केले असून त्याचा फटका सर्वात जास्त शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांना बाजारपेठ उपलब्ध होऊ शकत नाही. बाजारपेठ उपलब्ध न झाल्यामुळे पिके शेतामध्येच सडून गेली व जात आहेत. शेतकऱ्यांनी पिकांवर केलेला खर्चसुद्धा निघत नाही. शेतकरी संपूर्णतः उध्वस्त झालेला आहे. यातच भीमा नदीकाठचा शेतकऱ्यांची लाईट खंडित करून उरलेसुरले पिके सुद्धा पाण्यावाचून करपून जाऊ लागली आहेत. यातून शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होईल.
उन्हाळ्यामध्ये डोळ्यात तेल घालून शेतकऱ्यांनी पिके जगविली आहेत. लाईट कट केल्यामुळे उन्हाळ्यात जगविलेली पिके पावसाळ्याच्या तोंडावर जळून जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
लाईट खंडित केल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे सोलापूरला पाणी पोहचण्यासाठी कमीत कमी १५ ते २० दिवस लागतील तोपर्यंत वीज पुरवठा खंडित केला तर पिण्याच्या पाण्याचा तर सोडाच पण शेतातील पिके करपून जातील. यामुळे हातातोंडाशी आलेला घास जातोय की काय अशा भीतीचे वातावरण शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे.
नदीला पाणी नसते, तेव्हा लाईट असते व पाणी आले तर लाईट नाही अशी परिस्थिती निर्माण झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी लाईट खंडित करण्याचा निर्णय म्हणजे सुलतानी जुलमी असल्याचे शेतकरी बोलत आहेत.
लाईट खंडित करण्याचा निर्णय मागे घेऊन पूर्ववत करण्याचा जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन कर्जबाजारीपणा, दुष्काळी, पिकांना हमीभाव अशा अनेक समस्यांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची लाईट चालू केल्यास शेतातील उभ्या असलेल्या पिकांना जीवदान मिळेल व शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे येतील.
मनुष्य, पशु यांच्या पिण्याच्या पाण्याचा व पिकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी व महावितरणचे अधीक्षक अभियंता यांनी तातडीने लाईट चालू करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील