पुणे, दि.१२ जून २०२०: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थान सोहळ्याला अवघे काही तास उरले असताना आळंदी येथे कोरोनाने एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आळंदीला आता कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उद्याचा पालखी सोहळा कसा पार पाडतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
माऊलींच्या पादुकांचे उद्या म्हणजे शनिवारी ( दि.१३) रोजी प्रस्थान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीतही धर्मशाळा, मठ आणि लॉजमध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करण्यात आला आहे. व आळंदीला कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त आणि प्रांताधिकारी संजय तेली यांनी याबाबत माहिती दिली आहे. पजर या प्रतिबंधाच्या विरोधात कुणी काही केले तर त्यांच्यावर साथरोग प्रतिबंध अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी वारकऱ्यांनी आळंदीत न येता घरातूनच संतांचे पूजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्ञानेश्वर माउलींचा प्रस्थान सोहळा हा काही मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी