नवी दिल्ली, दि. १२ जून २०२०: कोविड बाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सध्या हे प्रमाण ४९.४७% आहे. आत्तापर्यंत एकूण १,४७,१९४ रुग्ण बरे झाले असून सक्रिय वैद्यकीय परीक्षणाखालील १,४१,८४२ रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात कोविड-१९ चे ६,१६६ रुग्ण बरे झाले आहेत.
रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण सुधारत असून टाळेबंदीच्या सुरवातीला असलेला ३.४ दिवसाचा कालावधी सुधारून आता १७.४ दिवसावर आला आहे.
कॅबिनेट सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिव, आरोग्य सचिव आणि नागरी विकास सचिवांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. कोविड-१९ च्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रतिबंध, चाचणी आणि सर्वेक्षण, आरोग्य पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारणे, रुग्ण निदान व्यवस्थापन आणि समुदाय सहभाग यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला.
राज्यांना देखील कोरोनाच्या नवीन केंद्रस्थानांवर विशेष लक्ष देण्यास आणि विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास सांगितले गेले. प्रतिबंधात्मक क्षेत्रातील रुग्ण सुरवातीच्या टप्प्यात ओळखण्यासाठी विशेष पथकाद्वारे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या. त्यांना रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विकास जलदगतीने करण्याची विनंती करण्यात आली जेणेकरून पुरेशी उपकरणे (उदा. पल्स ऑक्सिमीटर) आणि प्रशिक्षित मानव संसाधने (डॉक्टर, कर्मचारी परिचारिका, बिगर वैद्यकीय कर्मचारी) याची खात्री करुन घेण्याबरोबरच अपेक्षित रुग्णसंख्येनुसार व्यवस्थापन करता येईल.
विशेषत: असुरक्षित लोकांसाठी म्हणजेच वृद्ध आणि इतर गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी प्रतिबंधात्मक उपाय पुढे नेणे अत्यंत महत्त्वाचे असण्यावर जोर देण्यात आला. लक्षणांवर आधारित योग्य वेळी निदान आणि दिल्लीतील एम्सच्या सहकार्याने उत्कृष्टता केंद्रांद्वारे उपचार पद्धती सुधारण्यावर भर देण्यात आला. सुरक्षित शारीरिक अंतर नियमांचे पालन करण्याविषयी आणि कोविडला अनुकूल जीवनशैली आचरणात आणण्याबाबत समाजात वेळोवेळी जागृती करण्याबद्दल राज्यांना विनंती करण्यात आली.
आयसीएमआरने संक्रमित व्यक्तींमध्ये नोवेल कोरोना विषाणू शोधण्यासाठी चाचणी क्षमता वाढविली आहे. देशात एकूण ८७७ प्रयोगशाळा सध्या कार्यरत आहेत (६३७- सरकारी प्रयोगशाळा आणि २४० खाजगी प्रयोगशाळा). गेल्या २४ तासांत १,५०,३०५ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण ५३,६३,४४५ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी