सुशांत सिंगचा मृत्यू फाशीमुळे, पोस्टमार्टमच्या अहवालात नमूद

मुंबई, दि. १५ जून २०२०: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. रविवारी सुशांतचा मृतदेह त्याच्या मुंबईतील घरातल्या खोलीत सापडला. यानंतर सुशांतचा मृतदेह मुंबईतील कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला, तेथे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. सुरुवातीच्या पोस्टमॉर्टम अहवालानुसार, सुशांतचा मृत्यू फाशीमुळे जीव गुदमरून झाला असा आला आहे .

सुरुवातीच्या अहवालांमध्ये कोणत्याही प्रकारचे विष किंवा मृत्यूच्या इतर कारणांचा उल्लेख केलेला नाही. तथापि, सुशांतच्या शरिरावरच्या काही अंगांना तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. पहिला अहवाल सामान्य आला आहे , परंतु पुढील तपासणी फॉरेन्सिक लॅबकडे सोपविण्यात आली आहे.

सध्यातरी आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतू सुशांतचा व्हिसेरा (viscera) आणि त्याच्या शरीरातील इतर अवयव सुरक्षित ठेवले आहेत, ते जे जे रुग्णालयात पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविले जातील. दुसरीकडे, पोलिस सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूमागील कारण शोधत आहेत.

काल रात्री सुशांतसिंग राजपूतचे कुटुंब मुंबईमध्ये आले. आज सोमवारी सुशांतसिंग राजपूत वर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुशांतचे वडील पटण्यात एकटेच राहत होते. सुशांतच्या बहिणीने त्याच्या आत्महत्येची माहिती त्याच्या वडिलांना दिली. त्यानंतर ते प्रचंड मानसिक धक्केत व दु:खामध्ये होते.

सुशांतसिंग राजपूत बॉलीवूडचा उगवता सुपरस्टार होता. त्याच्या अचानक जाण्याने चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. कारण सुशांतसिंग राजपूत यानी चित्रपटात काम करण्यापूर्वी टीव्ही इंडस्ट्रीमध्येही काम केले होते. पीएम नरेंद्र मोदी यांनीही सुशांतच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. सेलिब्रिटींनीही पाणावलेल्या डोळ्यांनी सुशांत सिंगला श्रद्धांजली अर्पण केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा