नवी दिल्ली, दि. १७ जून २०२०: खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी काल भागधारक आणि खत कंपन्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. राज्यमंत्री मनसुख मांडवीय देखील या बैठकीला उपस्थित होते.
कोरोना आजाराच्या साथीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीतही सरकारला सहकार्य केल्याबद्दल श्री गौडा यांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींना यानिमित्ताने बोलताना धन्यवाद दिले. गौडा म्हणाले, आगामी खरीप हंगामातील पिकांसाठी खतांची उपलब्धता पुरेशी असल्याबाबत मंत्रालयाने खात्री दिली आहे. सर्व प्रकारच्या अडचणी असूनही खत उद्योगांनी आपले उद्योग सुरू ठेवल्याबद्दल श्री गौडा यांनी त्यांचे कौतुक केले.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, खरीप हंगाम सुरू झाला आहे, आणि देशाच्या विविध भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना प्रारंभ केला आहे. ते म्हणाले, यावर्षी चांगला पावसाळा अपेक्षित आहे. म्हणूनच, यावर्षीही खतांची मागणी चांगली राहू शकते, यावर त्यांनी भर दिला. मागच्या वर्षीच्या तुलनेत, यंदा एप्रिल, मे आणि जून या महिन्यात युरिया आणि पी अँड के या दोन्ही खतांच्या थेट लाभ हस्तांतरणाच्या (डिबीटी) विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.
ते म्हणाले खरीप हंगामात साधारणपणे १७० लाख मेट्रिक टन युरियाची आवश्यकता आहे, तर उत्पादन साधारणपणे १३३ लाख मेट्रिक टन असू शकते. ही तफावत आयातीच्या माध्यमातून पूर्ण करता येईल. यापूर्वीच दोन जागतिक निविदा काढल्या गेल्या आहेत आणि देशभरातील शेतकऱ्यांच्या गरजा भागविण्यासाठी खत विभाग युरियाची आयात करीत राहणार आहे. कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सूचना आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी यावेळी मांडल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी