लडाख, दि. १७ जून २०२०: गलवान व्हॅलीजवळील भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकींमध्ये चीनलाही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. सीमेजवळ तणाव निर्माण झाल्यानंतर मोठ्या संख्येने रुग्णवाहिका सीमा लगत बघण्यात आल्या आहेत . तसेच स्ट्रेचर वरून मृत सैनिक व जखमी सैनिकांना नेताना देखील बघण्यात आले. मिळालेल्या वृत्तानुसार चीनचे सुमारे ४० पेक्षा जास्त सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. चीनच्या नेहमीच्या सवयी प्रमाणे त्यांनी अद्याप मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही किंवा सांगण्यात येत असलेला मृतांचा आकडा मान्य केलेला नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार या घटनेत चीनचा कमांडिंग ऑफिसरही ठार झाला होता, जो या चकमकीचे नेतृत्व करीत होता. या चकमकीत भारतीय लष्कराचे कमांडिंग ऑफिसरही शहिद झाले आहेत .
रुग्णवाहिकेतून नेले जात आहे सैनिकांना
सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार १५ ते १६ जून रोजी रात्री गलवान व्हॅलीजवळ उभय देशांच्या सैनिकांमधील हिंसक चकमकीत चीनला मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या अंदाजाचा आधार असा आहे की चीन सीमेवर स्ट्रेचर, रुग्णवाहिकांद्वारे जखमी आणि मृत सैनिक नेले जात आहे. या व्यतिरिक्त, गलवान नदीजवळ चीनी हेलिकॉप्टरची हालचाल वाढली आहे, ज्याद्वारे सैनिकांची वाहतूक केली जात आहे.
याशिवाय चीनबरोबर या संघर्षात सहभागी झालेल्या सैनिकांनीही याची पुष्टी केली आहे. तथापि, चीनचे किती नुकसान झाले आहे याचा नेमका आकडा अद्याप समोर आला नाही, तथापि ही संख्या जवळपास ४० असल्याचे बोलले जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी