जामखेड, दि. २४ जून २०२० : जामखेड कर्जत मध्ये चोरीचे प्रमाण हे वाढतच चाललेले पाहण्यास मिळत आहे. मागील काही दिवसांपूर्वी कर्जत तालुका मध्ये काही चोरीच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्या घटना ताज्या असतानाच आता जामखेड
तालुक्यातील पोकळे वस्तीवर तात्याराम पोकळे यांच्या घरावर बुधवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. दोन लाख रुपये रोख व २२ तोळे सोने असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री एक ते तीनच्या सुमारास ही चोरी झाली. दरोडेखोरांनी पाठीमागचा दरवाजा कटावनीच्या सहाय्याने तोडला आणि ते आत घुसले. सर्व झोपेत असतानाच ही चोरी झाली. तात्याराम यांच्या आई पहाटे ऊठल्यानंतर त्यांना दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर ही चोरी लक्षात आली. अशी माहिती पोलिस सूत्रांनुसार मिळालेली आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमीर सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक सुरेश माने, अरजित मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या घटनेनंतर जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. चोरीचा पुढील तपास हा जामखेड पोलिस करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष