काय आहे अनलॉक २ चे स्वरूप

नवी दिल्ली, दि. ३० जून २०२०: केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक-२ साठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या अनलॉक-२ मध्ये प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाहेर अनेक कामांसाठी परवानगी देण्यात आली आहे. नव्या मार्गदर्शक सूचना १ जुलै २०२० पासून लागू होणार आहेत, या ही टप्प्यात, अनेक गोष्टी हळूहळू सुरु करण्याची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे. काल जारी झालेल्या नव्या मार्गदर्शक सूचना या, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून आलेल्या सूचना आणि प्रतिसादानुसार, तसेच विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांशी सविस्तर सल्लामसलत केल्यानंतर तयार करण्यात आल्या आहेत.

३० मे २०२० रोजी जारी करण्यात आलेल्या, अनलॉक-१ च्या आदेश आणि मार्गदर्शक सूचनांनुसार, काही कामांना कालबद्ध पद्धतीने परवानगी देण्यात आली होती. यात, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक प्रार्थनास्थळे, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि आतिथ्यशीलता व्यवसायाशी सबंधित इतर सेवा, शॉपिंग मॉल या सर्वांना, प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाहेर, ८ जून २०२० पासून परवानगी देण्यात आली होती. तसेच यासाठीचे, SOP म्हणजे प्रमाणित कार्यवाही कार्यपद्धती जारी करण्यात आली होती.

▫️अनलॉक-२ साठीच्या मार्गदर्शक सूचनांची ठळक वैशिष्ट्ये :-

• देशांतर्गत विमाने आणि प्रवासी गाड्यांना मर्यादित स्वरूपात चालवण्यास आधीच परवानगी देण्यात आली आहे. यापुढेही गाड्या आणि विमानांच्या परीचालनाला टप्प्याटप्याने वाढवले जाईल.

• रात्रीच्या संचारबंदीच्या वेळा शिथिल करण्यात आल्या असून, ही संचारबंदी आता रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत लागू असेल. त्यापुढे, औद्योगिक कारखान्यांमध्ये पाळ्यांमध्ये विनासायास काम सुरु व्हावे, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर व्यक्ती आणि मालाची वाहतूक सुरु राहावी, मालाचा चढउतार आणि बसेस, रेल्वेगाड्या तसेच विमानातून जनतेची वाहतूक सुरु व्हावी, यादृष्टीनेही रात्रीची संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.

• दुकाने कोणत्या क्षेत्रात आहेत, यानुसार, सुरक्षित भागात दुकानांमध्ये ५ व्यक्तीना काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यांना पुरेसे शारीरिक अंतर राखावे लागेल.

• १५ जुलै २०२० पासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रशिक्षण संस्थाचे कामकाज सुरु करण्यात परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भातील SOP म्हणजे प्रमाणित कार्यवाही कार्यपद्धती, केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाकडून जारी केली जाईल.

• राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर, असा निर्णय घेण्यात आला आहे की शाळा, महाविद्यालये आणि खाजगी कोचिंग क्लासेस ३१ जुलै, २०२० पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

• ‘वंदे भारत’ अभियाना अंतर्गत, आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. पुढच्या प्रवासासाठी टप्याटप्याच्या पद्धतीने परवानगी दिली जाईल.

▫️खालील गोष्टी वगळता, इतर सर्व गोष्टींना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर परवानगी देण्यात आली आहे:

मेट्रो ट्रेन चित्रपटगृहे, जिम, स्विमीग पूल, मनोरंजन पार्क्स, थिएटर, बार, सभागृहे, आणि तत्सम सार्वजनिक जागा.

१.सामाजिक/राजकीय/क्रीडा/मनोरंजन/शैक्षणिक/सांस्कृतिक/धर्मिक कार्यक्रम आणि इतर मोठी संमेलने.

२. या सर्व गोष्टी सुरु करण्यासाठीच्या तारखा, त्यावेळच्या परिस्थितीचा अभ्यास करुन, त्यानुसार, वेगळ्या निश्चित केल्या जातील.

प्रतिबंधित क्षेत्रात ३१ जुलै २०२० पर्यंत, लॉकडाऊन लागू असून, त्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल. राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-१९ चे संक्रमण आटोक्यात आणण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यानुसार काळजीपूर्वक प्रतिबंधित क्षेत्रे निश्चित करायची आहेत. त्यासाठी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेतला जावा, प्रतिबंधित क्षेत्रात, नियंत्रण क्षेत्र निश्चित करुन, कठोर पद्धतीने नियमांची अंमलबजावणी केली जावी, तिथे केवळ अत्यावश्यक कामांनाच परवानगी दिली जावी.

ही प्रतिबंधित क्षेत्रे, संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळांवर आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांकडून अधिसूचित केली जावीत. तसेच, त्यांची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयालाही कळवली जावी.

प्रतिबंधित क्षेत्रातील व्यवहारांवर राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांची बारीक देखरेख असावी आणि या क्षेत्रांसंबंधी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे कठोर पालन केले जावे.

प्रतिबंधित क्षेत्रांची आखणी आणि या क्षेत्रात मार्गदर्शक सूचनांचे पालन. यावर, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय देखरेख ठेवेल. प्रतिबंधित क्षेत्रांबाहेरील व्यवहारांबाबत राज्य सरकारे निर्णय घेणार

त्या त्या क्षेत्रातील परिस्थितीचे मूल्यमापन केल्यानंतर राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश, प्रतिबंधित क्षेत्रांबाहेरही काही कामे अथवा व्यवहारांसाठी बंदी घालू शकतील. किंवा ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, असे निर्बंध घालू शकतील.

मात्र, व्यक्ती आणि मालाच्या आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत वाहतुकीवर कोणतेही निर्बंध असणार नाही. अशा कोणत्याही वाहतुकीसाठी विशेष परवानगी/मंजुरी/इ-परवाना याची गरज लागणार नाही.
रात्रीची संचारबंदी

रात्रीची संचारबंदी आता, रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत लागू असेल. मात्र अत्यावश्यक सेवा आणि अनलॉक-२ मध्ये दिलेली शिथिलता, याला अपवाद असेल.
कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठीच्या राष्ट्रीय सूचना

कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठीच्या राष्ट्रीय सूचना देशभरात पुढेही लागू असतील, यात सामाजिक अंतराच्या नियमांचे प्रामुख्याने पालन अपेक्षित आहे. दुकानांमध्येही, ग्राहकांनी शारीरिक अंतर राखणे अनिवार्य असेल. केंद्रीय गृहमंत्रालय या राष्ट्रीय सूचनावलीच्या प्रभावी अंमलबजावणीवर देखरेख ठेवेल.

▫️दुर्बल व्यक्तींचे संरक्षण

दुर्बल किंवा, आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असलेल्या व्यक्ती, म्हणजेच ६५ वर्षांवरील वयाच्या, इतर आजार असलेल्या, १० वर्ष वयाखालील मुले आणि गर्भवती महिला अशा सर्वांना अत्यावश्यक कामे वगळता घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

▫️आरोग्य सेतूचा वापर

आरोग्य सेतूचा अधिकाधिक वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले जावे.
गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा