बारामती, दि. ३० जून २०२०: बारामती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या महाविरपथ येथील मे. राजस्थान सारीज दुकानाच्या तळघरातून अज्ञात चोरटयांनी गाळयाचे शटर उचकटुन कपड्याचा माल चोरी केला होता. या बाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे १२ एप्रिल रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध अखेर बारामती शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने लावला आहे.
बारामती शहरातील आमराई वसाहत येथील महिला आरोपी आरती शंकर पाथरकर (वय २५ वर्षे ), सारिका लाला भाले (वय ३० वर्षे ) दुर्गा आकाश साळुखे (वय २५ वर्षे ) शकिला इस्माईल कुरेशी (वय २२ वर्षे) यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून तपास केला असता १२ एप्रिलच्या पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास काही महिला डोक्यावर कपड्याचे गाठोडे घेऊन जात असल्याचे शेजारच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते.
मात्र पहाटेच्या अंधारात चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने ओळखणे अवघड जात होते. गोपनीय विभागाने खबऱ्यांमार्फत माहिती घेतली असता संशयित महिलांची ओळख पटवून महिला आरोपीना अटक केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. त्यांच्याकडून तपासादरम्यान १९ ,१६० रूपये किंमतीचा चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाई मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, योगेश शेलार, सहा. फौजदार संदिपान माळी, पो.ना ओंकार सिताप, पो.कॉ. पोपट नाळे, राजेश गायकवाड, सिध्देश पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे, अंकुश दळवी, दशरथ इंगवले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी, अकबर शेख, उमेश गायकवाड यांनी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी