वाघोली, दि. ९ जुलै २०२०: येथे आज दि. ९ रोजी पीएमआरडीए यांनी २२ कोटी रुपये निधी मंजूर करून सात ते आठ महिन्यापूर्वी वाघोली मधील वाढीव पाणीपुरवठा योजनेची वर्क ऑर्डर देऊन सुद्धा सदर योजनेच्या कामाला सुरुवात झाली नव्हती. यासाठी आज वाघोली ग्रामपंचायत सदस्य व वाघोली मधील नागरिकांच्या उपस्थितीत ( PMRDA ) औंध या ठिकाणी आंदोलन केले होते.
त्यानंतर २४ जून रोजी शिवसेनेचे मा. खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या नेतृ्त्वाखाली पुणे शिवसेना जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांच्या समवेत वाघोली ग्रामस्थ व सदस्य यांची पीएमआरडीए आयुक्त विक्रम कुमार व जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांच्याशी वाघोली आव्हळवाडीतील रखडलेली नवीन वाढीव पाणी पुरवठा योजने संदर्भातील अडचणींवर चर्चा करण्यात आली होती. आयुक्तांनी योजनेचे काम त्वरित चालू करावे असे निवेदन देण्यात आल्या नंतर आयुक्तांनी दहा दिवसांमध्ये काम चालू होईल व मार्च २०२१ पर्यंत ते पूर्ण करणार असं आश्वासन देण्यात आलं होतं.
त्यानुसार अनेक दिवसांपासून रखडलेल्या वाघोली येथील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली, व ५ एम. एल. डी. पाणी दिवसाला वाघोलीसाठी उपलब्ध होणार आहे. आज चालू झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके मा. उपसरपंच रामकृष्ण सातव मा. उपसरपंच संदीप सातव, गणेश गोगावले, अनिल सातव, मच्छिंद्र सातव, व ग्रामस्थ उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे