शाळेचा दरवाजा उघडणार तर कधी ?

पूर्ण वर्ष वाया जाते की काय ? पालकांसह विद्यार्थ्यांमधून नाराजीचे सूर…. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिक्षणाकडे पाठ….

इंदापूर, दि. १४ जुलै २०२०: संपूर्ण राज्यासह इंदापूर तालुक्यात दर वर्षी जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष नव्या जोमाने सुरू होते. जून मध्ये विद्यार्थी व पालकांचे पाठ्यपुस्तके, दप्तर, वह्या, कपडे, पेन, पेन्सिल आदी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजार पेठेत मोठी गर्दी पहायला मिळत होती. यंदा मात्र जून महिना संपून जुलै महिना सुरू झाला तरी तालुक्यात ना बाजार पेठा चालू, ना शाळा सुरू अशी अवस्था सध्या इंदापूर तालुक्यात पहायला मिळत आहे.

तालुक्यात सतत लाॅकडाऊन आणि जनता कर्फ्यु लादल्याने तालुक्यातील सर्वच नागरिक, व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी वैतागून गेले आहेत. यंदा तालुक्यात कोरोना महामारीच्या संकटात गेल्या तीन महिन्यापासून विद्यार्थी घरीच बसून आहेत. शाळे समोरुन जात असताना आपल्या बाबांना विद्यार्थी विचारतात, बाबा जून महिना निघून गेला अजूनही शाळेच्या गेट ला कुलूप ठोकलेलेच आहे.

बाबा शाळेचे कुलूप उघडणार तर कधी? असे विद्यार्थी आपल्या पालकांना प्रश्न करताना दिसतात. कारण दर वर्षी नवीन जोशात जून महिन्यात शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होतोय. जून महिन्यात शाळेच्या मैदानावरील विद्यार्थ्यांच्या खेळाच्या मजा काही औरच असते. यंदा तालुक्यात मान्सूनचा पाऊस चांगला झाल्याने सर्वत्र प्रसन्न वातावरण पहायला मिळत आहे. अशा प्रसन्न वातावरणात हे विद्यार्थी लाॅकडाऊनमुळे घरीच बसून राहिल्याने विद्यार्थ्यांना एक दिवस म्हणजे एक वर्ष झाले आहे.

अशा कंटाळवाण्या काळात विद्यार्थ्यांना सतत शाळेच्या खेळाच्या मैदानावरील आठवणी सतावत आहेत. कारण जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच शालेय परिसर हा विद्यार्थ्यासाठी जणू काही स्वर्गच बनलेला असतो. हा आनंद यंदा विद्यार्थ्यांना मिळताना दिसून येत नाही. गेल्या मार्च महिन्यापासून शाळेला कुलूप ठोकल्याने विद्यार्थ्यांना घरी बसून दिवस काढणे खूप कठीण जात आहे. पंधरा दिवसाची दिवाळी सुट्टी, महिनाभराची उन्हाळा सुट्टी, दर वर्षी ठरलेेेेली असते. परंतु यंदा मात्र विद्यार्थ्यांना चक्क सलग तीन महिन्याची सुट्टी झाली तरी अजून ही शाळा सुरू व्हायचा पत्ता नाही. म्हणून विद्यार्थी घरी बाबांना विचारतात, बाबा यंदा शाळेची घंटा वाजणार तरी कधी ? या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर कोण देणार ? ना बाबा, ना शिक्षक, ना प्रशासन.

सध्या कोणाकडे ही याचे उत्तर मिळायला शक्य नाही. अशा या कोरोना महामारीच्या संकटात यंदाचे शैक्षणिक वर्ष हरवून गेले आहे. दर वर्षी जून महिन्यातील शाळेच्या परिसरातील आठवणीने सध्या विद्यार्थी व्याकूळ होताना दिसतात. यंदा नवीन शैक्षणिक वर्षातील आनंदाला विद्यार्थ्यांना मुकावे लागले आहे. कोरोना महामारीचे संकट दूर होऊन कधी एकदा ज्ञान मंदिराची दारे उघडतील असे विद्यार्थ्यांना झाले आहे. शाळा बंद शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी नवीन शैक्षणिक वर्षाचा आनंद मात्र विद्यार्थ्यांना लुटता आला नाही. म्हणून पुन्हा एकदा शालेय परिसरातील आनंद मिळवण्यासाठी सध्या तालुक्यातील विद्यार्थी अतुर झाले आहेत.

महामारीच्या संकटा मुळे सध्या तालुक्यात शाळा बंद शैक्षणिक वर्ष चालू झालेले आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचे काम सध्या शिक्षक करतात.परंतु दर वर्षा प्रमाणे नवीन शैक्षणिक वर्षातला आनंद मात्र विद्यार्थ्यांना मिळताना दिसून येत नाही. जणू यंदा कोरोना महामारीने नवीन शैक्षणिक वर्षातला विद्यार्थ्यांचा आनंद हिरावून घेतला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा