जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पुरंदर मधील कोरोना परिस्थितीचा आढावा

6

पुरंदर, दि. १४ जुलै २०२० : पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी आज पुरंदर तालुक्यातील तहसील कचेरीत भेट देऊन पुरंदर मधील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरंदर आणि जिल्ह्यातील कोरोना स्थितीबद्दल पत्रकारांशी संवाद साधला.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असलेल्या पुरंदर तालुक्यात सुद्धा कोरोनाचे मोठे संक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी आज पुरंदर तालुक्यात येऊन पुरंदर तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. सासवड तहसील कार्यालयात पुरंदर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यावेळी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, पंचायत समितीच्या सभापती नलीनी लोळे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, जेजुरीचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश माने, सासवडचे मुख्याधिकारी विनोद जळक, जेजुरीचे मुख्याधिकारी पूनम शिंदे, निवासी नायब तहसीलदार सुर्यकांत पठाडे, नायब तहसीलदार उत्तम बडे यांच्यासह लोकप्रतिनिधी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी करावयाचे उपाय योजनांच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुरंदर तालुक्यात आणि जिल्ह्यात कोरोना अटकाव करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबतची माहिती दिली.

यावेळी ते म्हणाले की. कोरोनाला अटकाव करण्यासाठी शासनाच्यावतीने कडक उपाय योजना करण्यात येत आहे. आता अपेक्षा आहे ती जनतेकडून त्याला प्रतिसाद मिळण्याची. प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखून त्या पद्धतीने वागायला हवे. कोरोना आजार संसर्गजन्य असल्याने तो एकाकडून दुसऱ्याला होतो आहे. त्यामुळे कामाशिवाय लोकांनी बाहेर पडू नये अत्यावश्यक गरजेपोटी बाहेर येणाऱ्या लोकांनी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. तोंडाला लावलेला मास्क तुमच्या पासून कोरोना दूर ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याच बरोबर लोकांनी कोणत्याही प्रकारे गर्दी करू नये किंवा गर्दीमध्ये कोणीही सहभागी होऊ नये. बाहेरगावाहून किंवा कोरोना बाधित क्षेत्रातून आलेल्या लोकांनी स्वतःला कॉरंटाईन करून घेणे करून घेणे महत्त्वाचे आहे.

शहरातील लोक गावाला आल्यानंतर त्यांनी जास्त काळजी घ्यायला हवी. पुणे आणि इतर शहरातून नोकरी करणाऱ्या लोकांनी घरी आल्यावर आपल्या घरातील लोकांच्यात सामील न होता विलगीकरणात राहावे. काम आणि घर एवढंच वागणे अपेक्षित आहे. त्यांनी समाजामध्ये वावरू नये किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.

पुरंदर तालुक्यामध्ये यापुढे कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून प्रशासन कडक उपाय योजना राबवणार आहे. आहे मात्र त्याच बरोबर रुग्ण वाढले तर त्यांना योग्य ते उपचार देता यावेत म्हणून तालुक्यात कोविड केअर सेंटरची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आज चर्चा करण्यात आली आहे. काही खाजगी इमारती किंवा हॉस्पिटल्स वापरून पुरंदर मध्ये कोविड केअर सेंटरची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न आहे. कोरोना पसरू नये म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी जनतेची साथ असायला हवी लोकांमध्ये जनजागृती करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर जनजागृती करूनही जे लोक ऐकत नसतील त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येत आहे आणि यापुढे कडक कारवाई केल्या जातील असे त्यांनी म्हटले आहे. लग्न आणि अंत्यविधीच्या ठिकाणी गर्दी झाल्यास या पुढे कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे