ऑनलाइन मेट्रोमोनिअलच्या नावाखाली अनेकांची फसवणूक…

तीन महिन्यात इंदापूर तालुक्यात घडले अनेक प्रकार …

इंदापूर, दि. १५ जुलै २०२०: एका क्लिकवर सर्वकाही मिळवून देणाऱ्या या युगात अपुऱ्या ज्ञानाचा आणि निष्काळजीपणाचा अनेकांना मोठा फटका बसला आहे. सध्या कोरोनामुळे संपूर्ण जग थांबले आहे. त्यामुळे परगावी नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त राहणारे लोक सध्या आपल्या गावी घरात आहेत. याच कालावधीमध्ये घरातील सदस्यांमध्ये अनेक विवाह इच्छुकांच्या चर्चादेखील होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या नातलगांनी अनेक विवाह नोंदणी संस्थांकडे नोंदणी केली आहे. परंतु ठराविक रक्कम भरल्याशिवाय मुलाचे किंवा मुलीचे माहिती दिली जात नाही. तसेच त्यांना ठराविक रक्कम मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देतो असे सांगतात. एकदा त्यांच्या खात्यात रक्कम झाल्या जमा झाल्यानंतर मात्र त्यांचा फोन बंद लागतो किंवा ते फोन उचलत नाहीत असे अनेक नानाविध प्रकार या कालावधीमध्ये उघड झाले आहेत. अनेकांनी हजारो रुपये या मॅट्रिमोनियल साईटसाठी मोजले आहेत. परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

एवढे होऊनही कोणीही याबाबत वाच्यता करण्यास तयार नाही किंवा पोलीस ठाण्यात साधी तक्रार देखील देण्याची तसदी घेतली नाही.काहींना याबाबत विचारले असता किरकोळ रकमेसाठी कशाला पोलिसात तक्रार द्यायची आणि त्यांचा ससेमिरा मागे लागून घ्यायचं असे म्हणून ते या विषयावर पडदा टाकत आहेत. परंतु जर अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा बसला नाही तर मात्र भविष्यात अनेकांना लाखोंचा गंडा बसल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.

याबाबत पोलीस ठाण्यात कसल्याही तक्रारी नोंदविण्यात आल्या नसल्याची माहिती आहे. नागरिकांनी वेळेस सावध पवित्रा घेत संभाव्य धोका टाळला पाहिजे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा