कल्याण, दि. १८ जुलै २०२०: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात झालेला कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहेत. मात्र तरी देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट पाहायला मिळत नाही. म्हणूनच आता केडीएमसीने महापालिका क्षेत्रात ‘फॅमिली डॉक्टर- कोव्हिड फाईटर’ही नवी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या संकल्पनेअंतर्गत महापालिकेच्या सर्व प्रभागात असलेल्या फॅमिली डॉक्टरकडे ओपीडी साठी येणाऱ्या तापाच्या रुग्णांची अँटीजेन टेस्ट नजीकच्या ठरवून दिलेल्या टेस्ट सेंटरमध्ये केली जाणार आहे. यासाठी ५ ते ६ फॅमिली डॉक्टरांचा क्लस्टर तयार करण्यात येऊन त्यांच्या सोयीनुसार जवळच्या शाळेत / हॉलमध्ये टेस्ट सेंटर उभारण्यात येईल. फॅमिली डॉक्टर हे त्या- त्या परिसरातील स्थानिकांचा विश्वासाचा माणूस असल्याने त्यांच्या मदतीने तपासणीसाठी येणा-या रुग्णांची मोफत अॅन्टीजेन टेस्ट केली जाणार आहे. ज्यामुळे त्वरित निदान होवून कोवीडबाधित रूग्णांचे लगेच अलगीकरण करून त्यांची पुढील उपचार प्रणाली सुरू होऊन कोवीड रूग्णांच्या संख्येस आळा बसण्यास मदत होईल असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.
दरम्यान या संकल्पनेची सुरुवात महापौर विनिता राणे यांच्या प्रभागात करण्यात आली. जुनी डोंबिवलीतील जन-गण-मन शाळेमध्ये शास्त्रीनगर रुग्णालय आणि परिसरातील डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यातील संशयित ८३ जणांची अँटीजेन टेस्ट केली. त्यापैकी ३४ जण पॉजिटीव्ह आढळून आले असून हीच संकल्पना फॅमिली डॉक्टर्स आणि नगरसेवकांच्या सहकार्याने संपूर्ण महापालिका क्षेत्रात राबवण्यात येणार असल्याची माहिती महापौर विनिता राणे यांनी दिली.
तसेच महापालिका परिसरातील सर्व लोकप्रतिनिधी आणि फॅमिली डॉक्टरांनी या कामात सहकार्य करून मोलाचा हातभार लावण्याचे आवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. त्याला आपल्याकडील लोकप्रतिनिधी आणि स्थानिक डॉक्टर कितपत प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे