मुंबई, दि. २६ जुलै २०२०: २६ जुलै रोजी भाजप नेत्या पंकजाताई मुंडे-पालवे यांचा वाढदिवस असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मागील दिवसांपासूनच त्यांच्या कार्यकर्त्यांचे तसेच त्यांच्या शुभचिंतकाचे त्यांना संदेश येत होते. ”ताई तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत, आम्ही तुम्हाला कुठे येऊन भेटू?” असे संदेश पंकजा मुंडेंना यायला लागले. कोरोनाच्या या महामारीच्या काळात स्थितीचे गांभीर्य समजून त्यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच २४ जुलैला त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त आवाहन केले.
त्या म्हणाल्या कि, मला खरंतर वाढदिवस साजरा करणे फारसे आवडत नाही. तरी, मागील काही वर्षांत मी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे हा देखील प्रयोग केला. मात्र, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणीही मला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईला येण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आपण जर मला मनापासून शुभेच्छा देत असाल तर त्या शुभेच्छा माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. मात्र, कुणीही मुंबईला येण्याचा प्रयत्न करू नका. आपण सर्व नियम पाळून आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे.
”यासोबतच मी जरी तुमच्यापर्यंत पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे”. या मुंडे साहेबांच्या वाक्याला स्मरण करत त्या म्हणाल्या की, तुम्ही जरी मला शुभेच्छा देण्यासाठी माझ्यापर्यंत पोहोचू शकत नसलात तरी तुमच्या शुभेच्छा नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून कुणीही मला भेटण्यासाठी येऊ नका, घरी राहून स्वतःचे आरोग्य जपूनच मला शुभेच्छा दिल्या तर हीच माझ्यासाठी माझी ताकद आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड