ठाणे, दि. २६ जुलै २०२०: ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढतच जात आहे आणि यातच ठाणे शहरात कोरोनाच्या संकटात बेकायदेशीर कामांची सुद्धा तितकीच वाढ होताना दिसत आहे. कारण कोरोनाच्या परिस्थितीत रुग्णांना मदतीचा हात देण्याऐवजी भरमसाठ प्रमाणात लूट सुरू आहे. काही दिवसांपुर्वी कोरोनाच्या औषधांचा काळाबाजार समोर आला होता, तर आता मात्र खाजगी रुग्णालय हे बिलात जास्तीचे पैसे लावून लूट करत आहेत. अशाच एका रुग्णालयाला ठाणे महानगरपालिकेने दणका दिला आहे.
ठाण्यातील घोडबंदर भागातील “होरायझन प्राइम ” या खासगी रुग्णालयाच्या विरुद्ध वाढीव दराने शुल्क आकारणी करीत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. याच पार्श्वभुमीवर मनपाने या खासगी रुग्णालयाची नोंदणी रद्द केली. वाढीव देयकांप्रकरणी कोविड रुग्णालयावर कारवाई झाल्याचे हे राज्यातील पहिलेच प्रकरण आहे.
“होरायझन प्राइम “या रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतला. मात्र याला दिलेला कोविड रुग्णालयाचा दर्जा कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. मार्च महिन्यात या रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून घोषीत करण्यात आले होते. या रुग्णालयाने २ एप्रिल ते १२ जुलै या कालावधीत एकूण ७९७ रुग्णांवर उपचार केले. यात ५६ देयके गैरवाजवी दराने आकारण्यात आल्याची बाब पथकाच्या निदर्शनास आली होती. या देयकांची आक्षेपार्ह रक्कम ६ लाख ८ हजार ९०० रुपये इतकी आहे.
हे रुग्णालय तसेच शहरातील इतर खासगी कोविड रुग्णालयांमधून अश्या प्रकारची बिल वाढ ही आकारली जाते. त्यामुळे अशा अनेक रुग्णालयांबद्दल वाढीव बिलांच्या तक्रारी पालिकेला येत होत्या. त्यामुळेअशा बेकायदेशीर कामांना आळा बसण गरजेचे आहे असे नागरिकांकडून म्हटले जात आहे. त्यामुळे “होरायझन प्राइम सारख्या इतर रुग्णालयांमधून होणारी बिल वाढ कशी थांबवली जाईल आणि यावर मनपा कशाप्रकारे कारवाई करते यावर सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे