कारगिल विजय दिनानिमित्त पिंगोरी येथे शहिदांना अभिवादन

पिंगोरी (पुरंदर), दि. २६ जुलै २०२०: पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंगोरी गावात आज कारगिल विजय दिनानिमित्त शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यात आले. जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या हस्ते शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन कारगीलमध्ये तसेच इतर युद्धात प्राणार्पण करणाऱ्या जवानांना अभिवादन करण्यात आले.

पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावातील शहीद शंकर राजाराम शिंदे यांनी कारगिल लढाईत आपल्या प्राणांची आहुती दिली होती. आज पिंगोरी गावातील तरुण व जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या हस्ते शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी जेजुरी पोलिस स्टेशनचे संदीप कारंडे, पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे, उपसरपंच वसंत शिंदे, माजी सरपंच पल्लवी भोसले, माजी उपसरपंच धनंजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे, माजी सैनिक महादेव गायकवाड, सैनिक नवनाथ शिंदे, माजी सैनिक भरत शिंदे, भगवान शिंदे, शरद ताकवले आदींसह निवडक तरुण उपस्थित होते.

यावेळी येथे सैन्य सेवेत असलेले नवनाथ शिंदे म्हणाले की, देशाच्या कामी येण्याचे भाग्य आमच्या गावातील सैनिकांना लाभले. देशाचे संरक्षण करत असताना शत्रूला ताठ मानेने सामोरे जात कारगिल युद्धात आपल्या सैनिकांनी त्यांना आस्मान दाखवले. या युद्धामध्ये आपल्या गावातील शहीद शंकर शिंदे सारख्या जवानांना अतुलनीय पराक्रम करण्याचा संधी मिळाली. अशा प्रकारची संधी साधण्यासाठी आपल्या गावातील तरुण सदैव तत्पर असतात. म्हणूनच गावातील अनेक तरुण आजही सैन्यामध्ये भरती होताना दिसत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. अंकुश माने म्हणाले की कारगिल युद्धामध्ये भारतीय सैन्याने इतिहास घडवला यामध्ये पिंगोरी   येथील शहीद शंकर शिंदे या जवानाने आपल्या प्राणांचे बलिदान दिले, अशा वीर जवानांनचा आम्हाला अभिमान आहे. प्रकाश शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा