मुंबई, २८ जुलै २०२०: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली. कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्हर्च्युअली घेण्यात आली होती. तर बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राज्य सरकारवर सडकून टीका केली.
भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राज्यातील नेत्यांना आता जोरदार तयारी करा आणि भाजपसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या स्वार्थापोटी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केले असून, येणाऱ्या काळात कुणाचीही मदत न घेता सत्तेत येण्यासाठी तयारी करा’, असे आदेशच भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहेत. या नंतर राज्यातील राजकारण हे चांगलच तापल्याचे दिसून आले आहे.
काँग्रेस ने केला पलटवार…..
या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत पलटवार केला आहे. भाजपाने स्वत:च्या हिमतीवर निवडणूक लढवून दाखवावे, त्यांच्या आमदारांचा आकडा नक्कीच खाली जाईल असा घणाघाती पलटवार थोरात यांनी केला आहे. तसेच त्यांनी “त्यांनी स्वप्ने बघावी, त्यांना कोणी बंदी घालू शकत नाही. आम्ही महाविकास आघाडी एकत्रित निर्णय घेतो, समन्वय चांगला आहे. आमचे सरकार यशस्वी होत आहे.” असे महाविकास आघाडीची तीन वेगवेगळी चाके वेगवेगळ्या दिशेला धावतात, अशी टीका भाजपने राज्य सरकारवर केली होती. त्या टीकेवर उत्तर देताना बाळासाहेब थोरातांनी हा आणखी एक टोला लगावला. देवेंद्र फडवणीस खोटे बोलतात.’एनडीआरएफ जाे निधी द्यायचा तो केंद्राने दिला, बाकीचा इतर निधी केंद्राने राज्य सरकारला दिला नाही. राज्य सरकारला शरद पवार यांचं मार्गदर्शन आहे, तर सरकार ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली चालले आहे, असंही सांगत बाळासाहेब थोरात यांनी तुफान फटके बाजी केली.
महाराष्ट्रात कोरोनाचे संकट असून सुद्धा राजकारण कमी न होता उलट जोर धरु लागला आहे. त्यातच भाजपाच्या या कार्यकरणी बैठकीच्या निर्णयाने भाजप हा स्वतंत्रपणे तयारीला लागतोय खरा पण यांच्या या निर्णयाची गाडी चुकली तर अनेक भाजप समर्थक हे पक्षावर नाराज होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर भाजपच्या स्वबळाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे कार्यकरणी धोरणे कशी असतील याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष्य लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी