पंतप्रधानांनी भूमीपूजनाला जाणं संविधानिक शपथीचा भंग – असदुद्दीनओवैसी 

नवी दिल्ली, दि. २८ जुलै २०२०: गेली अनेक दशकं राम मंदिराचा तिढा सुटता सुटत नव्हता. अखेर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूनं निकाल दिला आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा खटला निकाली लावला.

आता अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ५ ऑगस्ट २०२० ला  भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून त्यांच्याच हस्ते हे भूमीपूजन होणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी याला विरोध केला आहे.

अयोध्या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी त्यावर ओवैसींनी टीका केली होती. त्यामुळे राम मंदिरावर अजूनही राजकारण सुरूच असल्याचं दिसतं. नरेंद्र मोदी ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी जाणार असल्यानं ओवैसींनी याला विरोध केला आहे. आज त्यांनी ट्विट करून मोदींवर टीका केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले कि,  पंतप्रधानांनी भूमीपूजनाला हजेरी लावल्यास तो घटनात्मक शपथेचा भंग असेल. धर्मनिरपेक्षता हा घटनेच्या मूलभूत रचनेचा भाग आहे. आम्ही हे विसरू शकत नाही की बाबरी ४०० वर्षांहून अधिक काळ अयोध्येत उभी होती आणि १९९२  मध्ये एका गुन्हेगारी जमावाने ती पाडून टाकली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा