बारामती वनविभाग कार्यालयासमोर मजूर महिलांचे आमरण उपोषण

बारामती, २९ जुलै २०२०: बारामतीतील वन विभाग कार्यालयाने वनविभागातील काही महिलांना कामावरून कमी केल्याने या महिलांच्या वनविभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून महिलांना पूर्ववत कामावर घ्या अशी मागणी या महिलांनी केली आहे. तसेच नोकरीत कायम करून घेण्यासाठी या महिलांनी पुणे येथील औद्योगिक न्यायालयात दाद मागितली असून वनविभाग अधिकारी राहुल काळे यांनी जाणीवपूर्वक आम्हाला कामावरून कमी केला असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.

तसेच पुणे येथील औद्योगिक न्यायालय येथे दाखल केलेली तक्रार मागे घ्यावी तरच काम उपलब्ध करून देईल अशी धमकी वनविभागाचे अधिकारी काळे देत असल्याचा गंभीर आरोप देखील उपोषणकर्त्या महिलांनी केला आहे.

तसेच या महिलांनी वन विभागाचे काम सुटल्याने या महिलांवर उपासमारीची वेळ आली असून लवकरात लवकर आम्हाला पूर्ववत कामावर कायम करुन घेतले नाही तर हे बेमुदत उपोषण प्राणांतक सुरू ठेवणार असल्याचे व होणाऱ्या सर्व परिणामांना सर्वस्वी जबाबदार वन विभागाचे अधिकारी राहुल काळे राहतील अशी माहिती या महिलांनी दिली. तसेच वनविभागाचे अधिकारी राहुल काळे यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्या विभागाकडे काम उपलब्ध नसून काम उपलब्ध झाल्यावर या महिलांना कामावर रुजू केले जाणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.

आम्ही पुणे औद्योगिक कोर्टात केस दाखल केल्याने या गोष्टीचा राग मनात धरून वनविभागाचे अधिकारी राहुल काळे यांनी जाणीवपूर्वक आम्हाला कामावरून कमी केले आहे.
विद्या नवनाथ जमदाडे ( उपोषण कर्त्या महिला )

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा