कल्याण, दि. २ ऑगस्ट २०२०: पावसामुळे रस्त्यात खड्डे पडणे ही गोष्ट काय नविन नाही. प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक वाहन चालकाला ही खड्ड्यांची कसरत सहन करावीच लागते. अशीच परिस्थिती सध्या कल्याण डोंबिवलीकरांची झाली आहे. कारण केडीएमसीतील प्रमुख रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत. आणि त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना या खड्ड्यांच्या रस्त्यांमध्ये कसरत करत वाट काढावी लागत आहे.
सध्या डोंबिवलीपेक्षा कल्याण परिसराची अवस्था ही जास्त बिकट आहे. कारण डोंबिवलीवरून कल्याण गाठणारा पत्रीपुल सुद्धा अद्याप तयार नाही, त्यामुळे वाहन चालकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. कल्याण पूर्वेतून पश्चिमेला येणाऱ्या उड्डाणपुलावर तसेच वालधुनी परिसरातही रस्त्यांवर खड्डे आहेत तसेच स्टेशन परिसराला जोडल्या जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात खड्ड्यांच साम्राज्य आहे .
त्यामुळे पावसाळा सुरू होताच नागरिकांना या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. अशा खड्ड्यातून गाडी चालवणे म्हणजे जीव धोक्यात टाकण्यासारखे आहे. त्यामुळे अपघात होण्याची भिती वाहन चालक व्यक्त करत आहेत. पावसाला सुरवात होऊन दोन महिने झाले आहेत आणि इतक्यात रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे, त्यामुळे पूर्ण पावसाळा होईपर्यंत रस्त्याचे काय होईल हा प्रश्न उभा राहतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे