पुरंदर, ४ ऑगस्ट २०२०: लोकांच्या आरोग्याच्या वेगवेगळ्या २३ प्रकारच्या तपासण्या करणारे आरोग्य तपासणी यंत्र पुरंदर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचबरोबर हवेलीतील पुरंदर मतदारसंघात येणाऱ्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना आमदार फंडातून उपलब्ध करून देणार असल्याचे पुरंदर-हवेली आमदार संजय जगताप यांनी म्हटले आहे. या मशिनद्वारे सर्वसामान्य लोकांनी हेल्थ चेक अप करून लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयाला देण्यात आलेल्या आधुनिक आरोग्य तपासणी यंत्राचा शुभारंभ पुरंदर-हवेली चे आमदार संजय जगताप यांनी काल सायंकाळी केला. यावेळी बोलताना संजय जगताप यांनी लोकांनी या यंत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. आमदार संजय जगताप यांनी आमदार फंडातून सुमारे चार लाख रुपये खर्चाचे आरोग्य तपासणीचे यंत्र
दिले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे,नगराध्यक्षा वीणा सोनवणे, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, गटनेते सचिन सोनवणे, नगरसेवक, अजिंक्य देशमुख, गणेश शिंदे, बाळासाहेब दरेकर, बाळासाहेब सातभाई, हेमंत सोनवणे, ग्रामीण रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ.प्रमोद वाघ, हरिभाऊ रत्नपारखी, अनंत देशमुख आदी उपस्थित होते.
या आरोग्य तपासणी यंत्रामध्ये मधुमेह, रक्तदाब यासारख्या सुमारे २३ प्रकारची तपासणी एकाच वेळी होते. त्याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. कोरोनाच्या या काळात नागरीकांनी तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. आपल्याला इतर आजार काय आहेत हे माहित होण्यासाठी कमी वेळेत व मोफत तपासणी करता यावी यासाठी हे यंत्र जेजुरी ग्रामीण रुग्णालयासाठी देण्यात आले आहे.
यामधून २३ प्रकारची तपासणी पाच मिनिटांमध्ये होणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले. सासवड नंतर आता जेजुरी, नीरा व हवेली तालुक्यात दोन ठिकाणी हे यंत्र दिले जात असल्याची माहीती त्यांनी दिली. तर नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये आधुनिक पध्दतीची तपासणी होणा-या या यंत्राचा जेजुरीकरांना चांगला फायदा होईल असे नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी सांगितले. यावेळी डॉ.हरिदास रत्नपारखी यांनी ग्रामीण रुग्णालयातील विविध योजनांची माहीती दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे