उस्मानाबाद, ४ ऑगस्ट २०२०: उस्मानाबाद जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे परिस्थिती ही आणखीनच गंभीर बनत चालली आहे. यामुळे, कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजना संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज दिनांक ३ ऑगस्ट रोजी, शासकीय विश्रामगृह, शिंगोली येथे आढावा बैठक घेतली.
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रूग्ण हे जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. प्रामुख्याने माणसांच्या आयुष्याला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी कंटेन्टमेंट झोन करावेत. यामध्ये कडक पोलीस बंदोबस्त अंमलबजावणी करण्यात यावी. कोरोना टेस्टची संख्या वाढवाव्यात आणि जास्तीत जास्त बेड तयार करावेत तसेच जिल्हा रुग्णालयामध्ये उत्तम स्वरूपाचा नाष्टा व जेवण देऊन घरून येणारे जेवण बंद करावे. यासोबतच, विनाकारण या क्षेत्रात फिरणाऱ्या, फेसबुक लाईव्ह व व्हिडिओ करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी. तसेच, कोरोना रूग्णांच्या मृत्यूनंतर परिस्थितीनुसार नातेवाईकांनी डेड बॉडीची भावनिक होऊन मागणी करू नये असे आवाहन करत प्रशासनाने डेड बॉडी देऊ नये, अशा सूचना या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिल्या.
रूग्णांच्या टेस्ट रिझल्ट नॉट फाऊंड असे का येत आहे? याचा आढावा घेण्यात यावा,व दोषींवर कारवाई करण्यात यावे. प्रेस रिपोर्ट देण्याचा ताण डॉक्टर्स वर येत असल्याने प्रेस रिपोर्ट देण्याचे अधिकार माहिती अधिकार कार्यालयाकडे देण्यात यावे. जिल्ह्यात डॉक्टर्सची कमतरता जाणवत असल्याने नवीन डॉक्टर्स कोवीडसाठी त्वरित भरती करण्याची जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार अमित देशमुख यांना फोनवरून मेडिकल कॉलेजचे डॉक्टर्स देण्याची विनंती करण्यात आली आहे.
या बैठकीत आ. कैलास घाडगे- पाटील, नगराध्यक्ष नंदूराजे निंबाळकर, तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण, तहसीलदार गणेश माळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गाढवे- पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे,आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड.