पुरंदर, ५ ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात म्हणजेच नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे नाझरे धरणाचा पाणीसाठ्या मध्ये वाढ झाली आहे. या धरणात आता क-हा नदीच्या पत्रातून १३० क्यूसेक्स वेगाने पाणी येऊ लागले आहे
जून-जुलै हे पावसाळ्याचे महत्वाचे दोन महिने संपले तरीसुद्धा नाझरे धरणामध्ये कर्हेच्या पात्रातून पाणी आले नव्हते. त्यामुळे नाझरे धरणाची पातळी खाली गेली होती. नाझरे धरणावर जेजुरी सह बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील १३ गावातील पिण्याच्या पाणीपुरवठा योजना सुरू असतात त्यामुळे नजर धरणामध्ये पाणीसाठा असणे या भागातील लोकांसाठी महत्त्वाचे असते. गेल्या दोन महिन्यात नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नव्हता. गेल्या दोन दिवसापासून पुरंदर तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील डोंगररांगात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कर्हेचे पात्र आता वाहू लागले आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पाण्यामध्ये वाढ होताना दिसते आहे.
आतापर्यंत नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच काल मंगळवारी ३२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नाझरे धरणामध्ये सध्या ३१२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे त्यापैकी २०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे. म्हणजेच धरणात ३० टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. नाझरे धरणाची साठवण क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट एवढी आहे. याबाबतची माहिती शाखा अभियंता एस. जी. चौलांगव व विश्वास पवार यांनी दिली. दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे