पुरंदर, ५ ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील सासवड येथे अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजना नंतर पेढे वाटून व श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून आनंद व्यक्त करण्यात आला आहे.
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्या मध्ये श्रीराम मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ केला. त्याचा आनंद देशभर साजरा होत आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड मध्ये सुद्धा पुरंदर भाजपच्यावतीने पेढे वाटून हा आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपच्या शाखा कार्यालयासमोर श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच उपस्थितांना पेढे वाटण्यात आले. यावेळी पूरंदर भाजपचे अध्यक्ष आर.एन. जगताप, सासवड शहर अध्यक्ष साकेत जगताप, निलेश जगताप व निवडक कार्यकर्ते उपस्थित होते.
सासवड पोलिसांनी राम मंदिराच्या भुमीपुजनानंतर कोणीही आताताईपणा करणार नाही.सामाजीक शांतता बिघडणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर अत्यंत थोड्या लोकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतराचे पालन करत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी तालुका भाजपाध्यक्ष आर.एन. जगताप म्हणाले की, या देशातील लोकांचे अनेक वर्षा पासूनचे स्वप्न साकार होत आहे. आज आपल्या देशातील जनता आनंदी आहे. याप्रसंगी मी श्री रामप्रभूकडे प्रार्थना करतो की, या देशावर आलेलं कोरोनाचं संकट लवकर दूर होऊ दे. त्याचबरोबर या देशाच्या भूमीचे लचके तोडण्यासाठी जे टपून बसले आहेत. त्यांचा नाश करण्याची ताकत आम्हाला दे. यापुढे आपल्या देशावर कोणतेही परकीय आक्रमण आता आपण सहन करायचे नाही. दुर्जनांचा नाश आणि सज्जनांचा सांभाळ हे श्रीरामांचे तत्व आपण सर्वांनी अंगीकारायला हवे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे