भाजपच्या फेसबुकवरील भडकाऊ पोस्टवर कारवाई करण्यास फेसबुकचा नकार

11

नवी दिल्ली, १६ ऑगस्ट २०२०: सामाजिक माध्यमांमध्ये भारतात फेसबुक हे लोकप्रिय माध्यम म्हणून ओळखले जाते. अगदी उद्योगधंद्यांच्या जाहिरातींपासून ते राजकारणापर्यंत सर्वच गोष्टींसाठी फेसबुकचा वापर केला जातो. परंतु याचा इतर वेगळ्या मार्गाने देखील वापर होत असताना वारंवार निदर्शनास आला आहे. तो म्हणजे समाजात तेढ निर्माण करणे. आता याबाबतच धक्कादायक खुलासा समोर आला आहे. फेसबुकच्या धोरणाबद्दल ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने धक्कादायक खुलासा केला आहे. द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टवर कडक कारवाई करणाऱ्या फेसबुकने भाजपा नेते आणि संबंधित काही ग्रुपबद्दल नरमाईची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे.

फेसबुकचा भारतातील व्यवसाय हा खूप मोठा आहे. भारताची लोकसंख्या पाहता आणि फेसबुकविषयी आकर्षण पाहता निश्चित फेसबूक कोणत्याही कारणास्तव भारतातील आपल्या व्यवसायाला धक्का लागू देणार नाही. या व्यवसायिक कारणामुळेच फेसबुक’ने  हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजपा नेत्यांच्या पोस्टवर कारवाईस नकार दिला आहे.

याबाबतचा गौप्यस्फोट ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतातील फेसबुकच्या वरिष्ठ कार्यकारिणीने अशा पोस्ट बद्दल कारवाई करण्यास आखडता हात घेतला होता. यामध्ये भाजपचे चार नेते व फेसबुक वरील काही ग्रुप यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तसेच भडकाऊ पोस्ट टाकण्याबाबत असलेले नियम लागू करण्यास विरोध केला होता.

तेलंगणामधील एका पोस्टमध्ये अल्पसंख्याकांविरोधात हिंसा करण्याचे आवाहन केले गेले होते. ही पोस्ट भाजपाच्या तेलंगानातील आमदार टी. राजा सिंह यांनी केले होती. फेसबुकमध्ये सध्या कार्यरत असलेल्या आणि माजी कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, “अंखी दास यांचा या प्रकरणातील हस्तक्षेप हा कंपनीने सत्ताधारी पक्षाविषयी अनुकूलता दर्शवल्याचा व्यापक स्वरूपाचा भाग आहे.”

रिपोर्टनुसार फेसबुकच्या भारतातील पब्लिक पॉलिसी संचालक अंखी दास यांनी कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या. “भाजपा नेत्यांवर हिंसाचार पसरवणाऱ्या पोस्टवरून कारवाई केल्यास कंपनीच्या भारतातील व्यावसायिक वाढीला धोका निर्माण होऊ शकतो,” असे दास यांनी कर्मचाऱ्यांना सांगितल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी