आगामी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन

पुरंदर, दि.१९ ऑगस्ट २०२० :सध्याचा काळ हा कठीण काळ असून ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. तालुक्यात दररोजच्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक मंडळ गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणेशोत्सव सुध्दा अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी केले आहे.

पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील नीरा येथे काल रात्री गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसरपंच विजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, माजी सरपंच राजेश काकडे, माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले, निरा, जेऊर, पिंपरे,गुळूंचे कर्नलवाडी, पिंगोरी या गावचे पोलीस पाटील तसेच मंडळातील कार्यकर्ते व पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे, नीरा औटपोस्टचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना माने म्हणाले की, नीरा ग्रामस्थांनी शक्यतो एक गाव एक गणपती बसवावा. त्यासाठी ग्रामस्थांनी आपापसात चर्चा करून दोन दिवसात हा निर्णय घेऊन एक आदर्श निर्माण करावा. गणेशोत्सवादरम्यान सामाजिक कार्यावर भर द्यावा. लोकांच्या आरोग्य तपासणीसाठी लागणारे साहित्य, रक्तदान, अशा प्रकारच्या गोष्टींवर भर द्यावा. मंडळा मध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच कोणत्याही व्यक्तीला यावर्षी वर्गणी मागू नका. असे ते म्हणाले. यावेळी माजी सरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण यांनी या निर्णयाला सहमती देत दोन दिवसात याबाबत गणेश मंडळाशी चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

यावेळी आरपीआय,पुरंदर व साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्यावतीने नीरा गावांमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विविध क्षेत्रांमधून काम करणाऱ्या लोकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये चोवीस चोवीस तास ड्युटी करून गावात कोरोना पसरु नये म्हणून प्रयत्न करणारे पोलीस, पोलीस पाटील व त्यांना सहकार्य करणारे समाजसेवक, तसेच कोरोना बाबत वेगवेगळ्या वृत्तपत्र व सामाजिक माध्यमातून जनजागृती करणाऱ्या पत्रकारांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष राजू गोरे, याकूब सय्यद, सुनील पाटोळे, दादा गायकवाड यांनी कोरोनाच्या काळात प्रशासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक करत आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा