मुंबई, २० ऑगस्ट २०२०: सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला बरेच दिवस उलटले आहेत तरीसुद्धा अजून हा तेढ सुटलेला नाही. महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यामध्ये सुरू असलेला रस्सीखेच काल कोर्टाने मार्गी लावला. अखेर सुशांत प्रकरणाची तपास सीबीआयकडे (केंद्रीय अन्वेषण विभाग) सोपवण्यात आली आहे. या मुद्यावरून राज्यात काल राजकीय वातावरण चांगलचं तपालेलं दिसलं. अनेक नेतेमंडळींनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या त्यानंतर आता शरद पवार यांनी देखील या प्रकरणाबाबत आपले विधान केले आहे.
दाभोळकरांच्या हत्येनंतर याची तपासणी सीबीआयकडे देण्यात आली होती. दाभोळकर हत्या प्रकरणाला कित्येक वर्ष झाली, तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेले नाही. हीच गत सुशांत प्रकरणाची देखील होऊ नये अशी आशा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. “डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही, अशी मला आशा आहे,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
काल रिया चक्रवर्ती यांच्याविरोधात बिहारमध्ये नोंदवण्यात आलेला एफआयआर कायम ठेवत पुढील चौकशी ही सीबीआयकडे सुप्रीम कोर्टानं सोपवली. महाराष्ट्र पोलिसांच्या हातातून ही केस काढून घेतली आहे यावर शरद पवार असे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने सीबीआयला या प्रकरणात पूर्ण सहकार्य करावे. याबाबत बोलताना शरद पवार यांनी ट्विट केलं की, ‘सर्वोच्च न्यायालयानं सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल,” असंही ते म्हणाले.
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा आज पुण्यस्मरण दिन आहे. याचा योग साधत त्यांनी सुशांत सिंग प्रकरणाविषयी आपले हे विधान केले आहे. यासह त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन देखील केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी