पुणे, २६ ऑगस्ट २०२०: सध्या पुणे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये कोरोनाचं हॉटस्पॉट शहर ठरलं आहे. मुंबईला देखील पुण्यानं आता मागं टाकलं आहे. पण, या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात अलं आहे. पुण्याच्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये आज दोन स्वयंसेवकांना ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस देण्यात आला आहे. याआधीही या लसीची चाचणी मुंबईमध्ये करण्यात येणार होती. परंतु, काही कारणास्तव ती लांबणीवर पडली.
पुण्यात करण्यात आलेली ही मानवी चाचणी ऑक्सफर्डच्या लसीची म्हणजेच कोविशिल्ड ची पहिली चाचणी ठरली आहे. या दोन स्वयंसेवकांना ०.५ एम एल चा डोस देण्यात आला आहे. हा डोस देण्यापूर्वी या दोन्ही स्वयंसेवकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. ही लस शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरातील प्रतिकार प्रणाली काय प्रतिक्रिया देते तसेच याचे काय साईड इफेक्ट होतात का यासाठी या दोन्ही स्वयंसेवकांना काही काळासाठी रुग्णालयांमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तसेच घरी पाठवल्यानंतर देखील डॉक्टर या दोन्ही स्वयंसेविका वर लक्ष ठेवून राहणार आहेत. या लसीचा सकारात्मक परिणाम दिसून आल्यास २८ दिवसानंतर पुन्हा दुसरा डोस दिला जाणार आहे.
या लसीसाठी चाचणी प्रक्रिया मंगळवारपासून सुरु झाली होती. मंगळवारी या चाचणी प्रक्रियेचा भाग म्हणून तीन पुरुष आणि महिलांची तपासणी करण्यात आली. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेन्नर इन्स्टिटयूटने ही लस बनवली आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ या ब्राण्डनेमखाली ही लस दिली जाणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी