मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

5

नवी दिल्ली, ३ सप्टेंबर २०२० : टाळेबंदी उठवण्याच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल मार्गदर्शक सूचना जारी केल्या.

मेट्रो सेवा ७ सप्टेंबरपासून सुरू होत असून, चालवण्यात येणाऱ्या गाड्यांचे मार्ग आणि त्यांच्या फेऱ्या यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. १२ सप्टेंबरपर्यंत मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होईल असं पुरी यांनी म्हंटल आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी कडक निर्बंध घालण्यात आले असून, प्रवाशांचं मास्क घालण अनिवार्य आहे, तसंच स्थानकात येण्याआधी प्रवाशांची तापमान चाचणी करण्यात येणार आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात येणार आहेत. या मागर्दर्शक सूचनांनुसार दिल्ली, नोएडा, चेन्नई, जयपूर, हैदराबाद, कोलकाता, आणि लखनौ या शहरातील मेट्रो सेवा पूर्ववत होणार आहे. तथापि महाराष्ट्र सरकारने ही सेवा १ ऑक्टोबरपर्यंत सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी