भारतीय जहाजबांधणी उद्योगासाठी उचलले ‘हे’ महत्त्वाचे पाऊल

नवी दिल्ली, ४ सप्टेंबर २०२०: केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाने देशातील सर्व मुख्य बंदरांना केवळ भारतीय बनावटीच्या टग बोट्स खरेदी कराव्या अथवा भाड्याने घ्याव्या, असे निर्देश दिले आहे. ‘मेक इन इंडिया’ च्या सुधारित आदेशांनुसारच महत्वाच्या बंदरांवरील सर्व खरेदी प्रक्रिया केली जावी, असेही मंत्रालयाने म्हंटले आहे.
     

भारतीय जहाजबांधणी उद्योगाला पाठबळ देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, मेक इन इंडिया अंतर्गत जहाजबांधणीसाठी मंत्रालय काही देशांच्याही संपर्कात आहे. यामुळे भारतात जहाजबांधणी उद्योग वाढू शकेल.
     

देशातील जुने जहाजबांधणी कारखाने पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकार आमूलाग्र बदलाचे निर्णय आणि कृती करत आहे, असे जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले. जहाजबांधणी क्षेत्रातही भारताला आत्मनिर्भर करणारा हा निर्णय आहे. सरकार, जहाजबांधणी, जहाजदुरुस्ती, जहाजाचे नूतनीकरण आणि जहाज ध्वजांकन भारतातच केले जावे, अशी संपूर्ण व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले. आत्मनिर्भर जहाजबांधणी व्यवसाय  हे आगामी काळात प्रत्यक्षात अस्तित्वात येईल, असे ते म्हणाले.
     

नव्या मेक इन इंडिया धोरणानुसार बंदरावरील खरेदी/ भाड्याने घेण्याच्या वस्तू या आदेशाशी संलग्न असाव्या लागतील. भारतीय बंदर संघटनेचे व्यवस्थापकीय संचालकांची समिती नियुक्त करुन त्या त्या आधारे वस्तू – उपकरणांचा अपेक्षित प्रमाणित दर्जा निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे. ही समिती, पाच प्रकारच्या टग बोट्स मधून मान्यताप्राप्त प्रमाणित टग बोट्सचे डिझाईन निश्चित करेल, त्यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून मान्यता मिळाल्यानंतर  ते भारतीय बंडले संघटनेच्या संकेतस्थळावर अपलोड केले जातील.
     

अलीकडेच, कोचीन शिपयार्ड लिमिटेड या सरकारी कंपनीला नॉर्वेच्या सरकारकडून दोन मोठी स्वयंचलित जहाजे बनवण्याचे काम मिळाले आहे. ही पहिलीच मानवरहित जहाजे असतील. मंत्रालयाने घेतलेल्या विविध निर्णयांचा जहाज बांधणी उद्योगाला लाभ मिळेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा