नवी दिल्ली, ७ सप्टेंबर २०२०: चकमकी दरम्यान दिल्ली पोलिसांनी बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. भूपेंद्र उर्फ दिलावर सिंह आणि कुलवंत सिंग अशी या दोन दहशतवाद्यांची नावे असून हे दोघेही पंजाबच्या लुधियाना येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित भूपेंद्र उर्फ दिलावर सिंह आणि कुलवंत सिंग या दोन्ही दहशतवाद्यांविरूद्ध पंजाबमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. या दोघांना शनिवारी बुरारीच्या निरंकारी कॉलनीजवळ अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी दिलावर याला यापूर्वी पंजाब पोलिसांनी अबू धाबी येथून अटक केली होती, परंतु जामीन मिळाल्यानंतर तो तेथून पळून गेला होता. शस्त्रास्त्र घेण्यासाठी तो दिल्ली येथे आला असल्याची माहितीही मिळाली आहे,
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या म्हणण्यानुसार, त्यांनी दोन अतिरेकी भूपेंद्र उर्फ दिलावरसिंग आणि कुलवंत सिंग यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गोळीबार सुरू केला. पोलिसांनी या दोघांनाही विरोधी कारवाई करत असताना अटक केली. पोलिसांना त्यांच्याकडून सहा पिस्तूल आणि ४० काडतुसेही सापडली आहेत.
विशेष म्हणजे पाकिस्तान आधारित दहशतवादी संघटना ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’चा प्रमुख वधवासिंग बब्बर याच्यासह ९ जणांना जुलै महिन्यातच दहशतवादी घोषित केले गेले होते. या सर्वांना युएपीए कायदा १९६७ अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केले गेले आहे. हे सर्व बब्बर खालसा इंटरनॅशनल, शीख फॉर जस्टिस खलिस्तान जिंदाबाद फोर्स इत्यादी दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या यादीमध्ये शीख फॉर जस्टीसचे कायदेशीर प्रतिनिधी गुरपंतवंत सिंह पन्नू याच्या व्यतिरिक्त बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख वधवासिंग बब्बर, आंतरराष्ट्रीय शीख युवा महासंघाचा लखबीर सिंग, खलिस्तान जिंदाबाद फोर्सचा रणजितसिंग नीता, खलिस्तान कमांडो फोर्सचा परमजीतसिंग पंजावाड. हे सर्व जण सध्या पाकिस्तानात आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे