पुणे, ७ सप्टेंबर २०२०: बारामती शहरातील कोरोना विषाणूंच्या रुग्ण व रुग्ण दगावण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने बारमतीकरांना आवाहन केल्यावर आज सोमवार दि. ७ पासुन जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. काल रात्री पासून शहरात प्रवेश करणारे व अंतर्गत रस्ते बॅरीकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत. आज चौकाचौकात पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त होता. तर सर्व दुकाने बंद असल्याने शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला.
बारामती शहरात आजपासून कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यावर आज शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला. शहरात येणारे सर्व रस्ते बंद केले आहेत तर फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच नाागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. कालपर्यंत लॉकडाऊन या विषयावरून व्यापारी व पदाधिकारी यांच्यात तणावाचे वातावरण होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे व्यापाऱ्यांनी तक्रार केल्यावर शासकीय अधिकारी व व्यापारी यांच्यात बैठक होऊन यावर सात दिवस लॉकडाऊन ठेऊन त्यानंतर पुढील निर्णय घ्यायचे ठरल्यावर आज सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. आज सकाळपासून पोलीस बंदोबस्त कडक असल्याने शहरात येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांची चौकशी करून त्यांना आतमध्ये सोडत होते, तर लांबच्या प्रवासाची वाहने शहरात न जाता त्यांना बाहेरून बायपास मार्गे सोडत होते.
आजपासून पुकारलेला जनता कर्फ्यु हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी असला तरी शहरातील काही भागात हौशे, गौशे, तरुण मूलं व नागरिक रस्त्यावर दुचाकीवर व चालत फिरताना दिसत होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी :अमोल यादव