कर्जत, ९ सप्टेंबर २०२०ः कर्जत शहरातील व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोनाचा कहर वाढू लागल्यामुळे प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या बरोबर चर्चा केली.
कोरोनाचा कहर वाढू लागल्यामुळे कर्जत शहर बंद ठेवण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागल्या नंतर कर्जत शहरातील व्यापारी, व्यावसाईक, यांची बैठक झाली. प्रशासनाबरोबर चर्चा करण्याचे ठरल्यानंतर व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व काही व्यापारी यांनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.
कर्जत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन भोज, उपाध्यक्ष प्रसाद शहा, सचिव बिभीषण खोसे, खजिनदार संजय काकडे, मेनरोड व्यावसाईक संघटनेने अध्यक्ष गणेश जेवरे, विजय तोरडमल, महेश जेवरे, संतोष भंडारी, शेलार, विजय घालमे, सपी मेहेर, विनायक म्हेत्रे, आबा नेवसे आदी उपस्थित होते. व्यापारी असोसिएशनने कर्जत शहर काही दिवस कडक बंद करावे अशी मागणी केली. व्यवसायापेक्षा जीव महत्वाचा असल्याचे म्हटले. यावर प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केंद्र शासनाच्या सूचना प्रमाणे स्थानिक पातळीवर ‘बंद’चा निर्णय आम्हाला घेता येत नाही व जनता कर्फ्यु, लॉकडाऊन करणे हा कोरोनावर उपाय नाही, असे सांगताना प्रत्येकाने सुरक्षितता पाळणे, जास्तीत जास्त तपासणी करून घेऊन, पॉझिटिव निघालेल्या व्यक्तींवर उपचार करता येणार आहेत.
जे तपासणीच करणार नाहीत व अंगावर काढतील त्याच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे लवकर व जास्तीत जास्त तपासणी करणे आवश्यक असल्याचे म्हटले. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, मुख्याधिकारी गोविंद जाधव उपस्थित होते. गावात शिस्त लागण्यासाठी प्रशासनाने कडक उपाय योजना कराव्यात अशी मागणी यावेळी व्यावसायिकांनी केली. यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष