मुंबई, दि. १० सप्टेंबर २०२०: देशासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. सर्वसामान्यांसह अनेक अधिकारी, मंत्री, सेलिब्रिटीज यांनाही कोरोनाची लागण होत आहे. आज मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.
आपल्या ट्विट मध्ये किशोरी पेडणेकर म्हणाल्या कि, ”मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन.” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.
दरम्यान देशासह राज्यात कोरोनाचा वेग झपाट्यानं वाढत आहे. देशात मागील २४ तासांत सर्वाधिक ९५ हजार ७३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार १७२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४४ लाख ६५ हजार ८६४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७५ हजार ६२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३४ लाख ७१ हजार ७८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ९ लाख १९ हजार १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे