मुंबई, पुणे वैद्यकीय प्रवेशाचा कट ऑफ वाढणार

पुणे, ११ सप्टेंबर २०२०: नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ७०/३० टक्के कोट्याचा नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाचा परिणाम हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशामध्ये नक्की दिसून येणार आहे. विद्यार्थ्यांची एकमेकांसोबत स्पर्धा होणार ही निश्चित.

या निर्णयामुळे पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी मेडिकल प्रवेशसाठीचा कट ऑफ वाढणार आहे.लोकसंख्येच्या आधारावर आणि वैधानिक विकास महामंडळाच्या रचनेनुसार महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील मेडिकल प्रवेशाच्या जागांसाठी ७०/३० चा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र विधीमंडळात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हा कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.

या आधी पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ७० टक्यांच्या कोट्यामुळे जास्त जागा उपलब्ध होत होत्या. शिवाय विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई या ठिकाणच्या नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळत होता.

तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही त्यांच्या भागातील महाविद्यालयांतील प्रवेशांवर समाधान मानावं लागत होतं. मात्र आता सर्व विद्यार्थी समान पातळीवर गृहीत धरले जाणार आहेत. त्यामुळे नामांकित अनुदानित महाविद्यालयांचा कटऑफ सुमारे २५ गुणांनी वाढण्याची शक्‍यता वर्तवण्यात येतेय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा