मुंबई, १२ सप्टेंबर २०२०: ठाकरे सरकार आणि मुंबई विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं कंगनानं आपल्याच पायावर दगड मारून घेतल्याचं दिसत आहे. बॉलिवूड मधील परिवार वादावरून ती राजकीय वादाकडं वळत गेली आणि आता चांगलीच अडचणीत सापडताना दिसत आहे. भाजपा बरोबर तिनं ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला पण, हळू हळू तिच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. काल राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी मुबई पोलिसांना कंगनाच्या ड्रग्स संबंधांची तपासणी करण्याचे आदेश दिले.
यानुसार आज (शनिवार) कंगनाच्या ड्रग्स संबंधांची तपासणी सुरू केली जाऊ शकते. मुंबई पोलिसांना देखील सरकार कडून तपासणीसाठी आवश्यक असलेलं पत्र मिळालं आहे. या पत्रात कंगनाच्या तपासणीचे आदेश दिले गेले आहेत. अध्ययन सुमननं २०१६ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्याला आधार बनवून हे आदेश देण्यात आले आहेत. या मुलाखतीत कंगनाने कोकेन घेतल्याचा दावा केला गेला आहे. तर कंगना आता हे नाकारत आहे.
कंगनाने हे ट्विट केले
या नंतर कंगनानं एक ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली. आपल्या ट्विट मध्ये ती म्हणाली की, ‘कृपया माझी ड्रग्स चाचणी करून पाहा, माझ्या फोन कॉल्सचा तपशील तपासून पहा. जर तुम्हाला माझे ड्रग्स पेडलर्स सोबत काही संबंध आढळले तर मी माझ्यावरील आरोप मान्य करेल आणि कायमस्वरूपी मुंबईला देखील सोडेल. मी आपल्या भेटीसाठी उत्सुक आहे.’
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे