मुंबई, १२ सप्टेंबर २०२०: चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्स अँगलचा तपास करणार्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (एनसीबी) कारवाईस सुरुवात केली आहे. रिया चक्रवर्ती हिच्यासह सहा जणांना अटक केल्यानंतर एनसीबीनं त्यांच्या चौकशीच्या आधारे ड्रग्स माफियांच्या विरोधात कारवाईला वेग दिला आहे. शनिवारी सकाळी एनसीबीच्या पथकानं मुंबई आणि गोवा येथे छापा टाकला.
मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीची टीम ड्रग्ज पेडलर्सच्या ठिकाणांवर छापा टाकत आहे. अनुज केशवानी यांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकानं हा छापा टाकला आहे. असं म्हटलं जात आहे की चौकशी दरम्यान अनुजने ड्रग पेडलर्सची माहिती आणि त्यांचा पत्ता एनसीबीला दिला होता.
गोव्या मध्ये छापा टाकत असलेल्या एनसीबी चमूचे प्रमुख समीर वानखेडे आहेत. गोव्यात आणि मुंबईत टाकण्यात येणारे छापे हे सुशांत याच्या मृत्यूशी आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी रियशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे अनुज केशवानी यांना कैझाननंतर अटक करण्यात आली.
कैजाननं अनुजच्या नावाचा उल्लेख केला होता
रिया चक्रवर्तीशी संबंधित प्रकरणात अनुजचं नाव कैझाननं उघड केलं होतं. त्यानंतर एनसीबीनं अनुजला अटक केली. एक दिवसापूर्वीच एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीत भेटले. या बैठकीत पुढील धोरणावर चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्स अँगलची चौकशी करणारे एनसीबी अधिकारी मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.
दिल्लीत झालेल्या या बैठकीनंतर दुसर्याच दिवशी एनसीबीनं ड्रग्ज पेडलर्सच्या अनेक ठिकाणी छापे टाकले. एनसीबीनं या प्रकरणात रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि इतर ४ जणांना अटक केली आहे. एनसीबी चौकशीत रिया चक्रवर्ती हिने अनेक मोठी नावं उघडकीस आणली असून, त्याविरूद्ध एनसीबी लवकरच कारवाई करू शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे