तुळजाभवानी मंदिरातील दुर्मीळ नाणी आणि दागिन्यांची चोरी

तुळजापूर, १४ सप्टेंबर २०२० : कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दुर्मीळ खजिन्यावर मंदिराच्याच धार्मिक व्यवस्थापकाने हात साफ केला आहे. विविध राजे आणि राजवाड्यांकडून दिलेली ७१ पुरातन आणि दुर्मीळ नाणी तसेच देवीच्या अंगावरील दागिने गायब झाले आहेत. मौल्यवान माणिक, चांदीचे दोन खडाव आणि संस्थानाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच गायब केल्याचा अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडीवर अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.
                                                                                                                             साडेतीन शक्तिपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या श्रद्धेने भाविक तुळजापूर येतात. तुळजाभवानीच्या मंदिरातच हा धक्कादायक प्रकार घडल्याने भाविकांच्या श्रद्धेलाच तडा गेला आहे. पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे आणि त्यांचे विधिज्ञ शिरीष कुलकर्णी यांनी मंदिराच्या खजिन्यातील भ्रष्टाचाराच्या कारभाराविषयी अनेक तक्रारी केल्या होत्या.
                                                                                                                             त्यानंतर नुकत्याच केलेल्या पाहणीमध्ये अनेक पुरातन नाणी गायब असल्याचे चौकशी समितीच्या पाहणीत समोर आले. मंदिराच्या खजिन्याच्या एकूण अकरा चाव्या होत्या मात्र यापैकी तीन चाव्या हरवल्या आहेत. देवीच्या अंगावरील दागिने ठेवण्यासाठी पाच पेट्या आहेत. यातील चौथ्या पेटीत अकरा दागिन्यांची नोंद होती, ज्यात चांदीच्या पादुका गायब असल्याचं आढळलं. पाचव्या पेटीतील अलंकारही पळवून नेले असल्याचे आढळून आले. मौल्यवान दागिन्यांच्या या चोरी प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची शिफारस चौकशी अहवालात करण्यात आली होती.
                                                                                                                             अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. त्यानुसार तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलिप नाईकवाडी यांच्यावर अफरातफर आणि गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. मात्र अनेक महिन्यांपासून प्रत्यक्षात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. गुरुवार १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कौस्तुक दिवेगावकर यांनी शासनाच्या आदेशानुसार याप्रकरणी दिलिप नाईकवाडी यांच्यावर मौल्यवान व ऐतिहासीक दागिन्यांच्या गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश मंदिर समितीचे विश्वस्त तथा तुळजापूर तहसीलदार यांना दिले आहेत.
                                                                                                                         तुळजाभवानी मंदिरातील ही दुर्मीळ नाणी आहेत गायब
बिकानेर संस्थान- ४
औरंगजेब – १
डॉलर – ६
उदयपूर संस्थान- ३
शहाआलम इझरा- ४
बिबा शुरुक-१
फुलदार-१
दारुल खलिफा-१
फत्ते औरंगाबाद औरंगजेब आलमगीर-१
इंदूर स्टेट सूर्यछाप-१
अकोट-२
फरुखाबाद-१
लखनऊ-१
पोर्तगीज-९
इस्माईल शहा-१
बडोदा-२
रसुलइल्ला अकबर व शहाजहान- ४
जुलस हैदराबाद- ५
अनद नाणे- २०
न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा