इंदापूर, दि. १४ सप्टेंबर २०२०ः देशातील व राज्यातील जनमत हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे. राष्ट्रीय प्रवाहाबरोबर आपल्या तालुक्याने जावे यासाठी गेल्या वर्षी ११ सप्टेंबर रोजी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्यास १ वर्षे पूर्ण झाले आहे. भाजप प्रवेशामागे तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा हाही उद्देश असल्याची माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज सोमवारी (दि.१४ ) इंदापूर येथे दिली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ‘विरोधी पक्ष म्हणून वस्तुस्थिती मांडण्यासाठी एक संघटना म्हणून सरकारकडून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण भाजपच्या माध्यमातून अनेक आंदोलने, निवेदने, मागण्या करून जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला. आपण पाणी प्रश्नासाठी आंदोलन केले, दूध दरांबाबत हमीभाव संदर्भात आंदोलन केले, धार्मिक स्थळे मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले, नाभिक समाजाला न्याय देण्यासाठी आपण आंदोलन केले, पालखी मार्गामुळे ज्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत त्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन केले, जिल्हा परिषद वर्ग ३ व ४ यांच्या प्रश्नासाठी निवेदन दिले. भारतीय जनता पक्ष जनतेच्या प्रश्नांकरिता नेहमीच आपल्या पाठीशी उभा राहील. समाजामध्ये राष्ट्रीय स्तरावरचा जो पक्ष क्रियाशील असतो तोच पक्ष देशपातळीवरील समाजकारण, राजकारण करतो. नवीन वर्ग हा भाजपच्या संघटनेकडे वळत आहे. केवळ निवडणुकीपुरते काम करत नसून सातत्याने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाही मार्गाने काम केले आहे. परंतु सत्ताधारी केवळ वैयक्तिक पातळीला जाऊन विरोध करीत आहेत. ज्या जनतेने आम्हाला घरी बसवून तुम्हाला संधी दिली, त्याच जनतेसाठी भांडतोय.’
इंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाची वस्तुस्थिती अतिशय भयानक असून त्यासाठी तालुक्यातील प्रशासन गंभीर नाही. १३ सप्टेंबरपर्यंत आलेल्या रिपोर्ट मधून १७०८ रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यामध्ये १२०२ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत, तर ५०६ रुग्ण शहरी भागातील आहेत. त्यामध्ये ६५० रुग्णांवर उपचार चालू असून ५९ रुग्ण या मध्ये दगावले आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्णाचा मृत्यू दर इंदापूर तालुक्यात आहे. इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर हा ४ टक्के असून देशात सर्वात जास्त मृत्युदर पुणे जिल्ह्याचा आहे तर पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त मृत्यू दर हा इंदापूर तालुक्याचा आहे. ही गोष्ट नक्कीच लाजिरवाणी असून, नेमके प्रशासन काय काम करते हे समजत नसल्याचे मत माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
आम्ही विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवला तर काही लोकं राजकारण करता असे आरोप करतात, पण कोणाला काही वाटो आम्ही मात्र आवाज उठवणार. या आजाराशी सर्व मुकाबला करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. इंदापूर कोविड सेंटरमध्ये कुठल्याही सुविधा उपलब्ध नसून उपजिल्हा रुग्णालयात पॅरामेडिकल स्टाफ नाही, प्रभारी अधिकाऱ्याची नेमणूक, मेडिकल उपलब्ध नाही, किट नाहीत, तसेच एखादा रुग्ण गंभीर झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था नाही. तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये डॉक्टर पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यामुळे रुग्ण जाण्यास तयार नाहीत तसेच खाजगी यंत्रणा मदतीला नाही, व सरकारी यंत्रणा काम करायला कमी पडत आहे. निमगाव येथील कोविड सेंटरची परिस्थिती ही हतबल झालेली आहे. पेशंट फोन करून सांगतात “आम्हाला वाचवा” अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. एखादा पेशंट खाजगी हॉस्पिटलमध्ये गेला तर किमान दोन ते अडीच लाख रुपये खर्च येत असल्याने ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, अशा रुग्णांनी काय करावे हा मोठा प्रश्न इंदापूर तालुक्यात निर्माण झाला आहे. दररोज टेस्टिंगच्या माध्यमातून सरासरी ७० ते ७५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येत आहेत. बाकीच्या तालुक्यामध्ये शंभर बेड व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे. इंदापूर तालुक्यात का नाही. १००० बेडचे कोविड सेंटर का उभा करू शकत नाही. यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले असून त्यांनीच यामध्ये लक्ष घालावे अशी विनंती केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी तालुक्यात भारतीय जनता पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करणार असून केंद्राच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधक म्हणून नाहीतर गरज म्हणून काम पाहणार आहे असे मत व्यक्त केले. शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक कामे झाली असून विरोधक त्याचे क्रेडीट घेण्याचे काम करत आहेत असे यावेळी म्हटले. यावेळी इंदापूर नगरपालिकेचे गटनेते कैलास कदम आणि रघुनाथ राऊत उपस्थित होते.
प्रतिनिधी – निखिल कणसे.