नवी दिल्ली, २६ सप्टेंबर २०२० : लोकसभेत काल संसद सदस्यांचे वेतन, भत्ता आणि निवृत्तिवेतन दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकानुसार वर्षभरासाठी संसद सदस्यांचे वेतन आणि मंत्र्यांना मिळणारे भत्ते यामध्ये ३० टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. एक एप्रिल २०२० पासून एक वर्षापर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही कपात करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल लोकसभेत हे विधेयक मांडले होते.
दरम्यान अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आलं. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणं, कृषी क्षेत्रात स्पर्धा निर्माण करणं, ग्राहकांचे हीत लक्षात घेऊन नियंत्रण यंत्रणा सुटसुटीत करणं, हा या विधेयकाचा उद्देश आहे.
शेतकरी आणि ग्राहक यांच्या हिताचे हे विधेयक असल्याचं मत भाजप खासदार चौधरी यांनी व्यक्त केलं; तर तृणमूल काँग्रेसचे सुगातो रोय यांनी हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारे असल्याची टीका केली. काँग्रेसचे डॉ. अमर सिंग यांनीही हे विधेयक शेतकरी आणि गरिबांच्या विरोधातील असल्याचं मत व्यक्त केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: