पुणे, १९ सप्टेंबर २०२० : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत; जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनानं निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री आणि जिल्हयाचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी आज दिली. विधानभवन सभागृहात काल अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
‘कोरोना’चा रुग्णदर आणि मृत्यूदर कमी होण गरजेचं असून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. ग्रामीण भागात नव्यानं उभारलेल्या रुग्णालयांसाठी विशेष बाब म्हणून तात्काळ पदनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी तसंच रुग्णांवर उपचार करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असं पवार म्हणाले. रुग्णांना आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा यासाठी प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करावे, अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.
दरम्यान काल राज्यातले कोविड १९ चे २२ हजार ७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यातली आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ३४ हजार ४३२ झाली आहे. तर राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७१.४७ शतांश टक्के झालं आहे.
काल राज्यात २१ हजार ६५६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली कोरोनाबाधितांची एकंदर संख्या ११ लाख ६७ हजार ४९६ झाली आहे. राज्यात काल ४०५ जणांचा कोविड १९ मुळे मृत्यू झाला. राज्यातला कोविड १९ चा मृत्यूदर २.७२ शतांश टक्के झाला आहे. राज्यातल्या ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ३ लाख ८८७ आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी