राज ठाकरेंनी सिगारेट शिलगावली नाही, त्यांना दंडही नाही  – नितीन सरदेसाई 

मुंबई, २१ सप्टेंबर २०२०: सर्वात जलद आणि मसालेदार बातम्या देण्याच्या नादात अनेकदा वृत्तसंस्था या बातम्यांची शाहनिशा करत नाही आणि बातम्या प्रसिद्ध करतात, त्यामुळे अनेकदा गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. सोमवारी दि. २१ सप्टेंबरला एका इंग्रजी वृत्तसंस्थेच्या हवाल्याने अनेक मराठी वृत्तसंस्थांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दल एक बातमी प्रसारित केली. मात्र ती बातमी खोटी आणि खोडसाळ होती असं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केलंय. तसंच एका मराठी वृत्तसंस्थेकडून याबाबतचं स्पष्टीकरणही त्यांनी मागितलं आहे. 

राज ठाकरेंबद्द्दलची ती आक्षेपार्ह बातमी नक्की काय होती?

अनेक वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार, शुक्रवारी एका खासगी कामानिमित्ताने राज ठाकरे भाऊचा धक्का ते मांडवा या रो-रो सेवेने प्रवास करत होते. या प्रवासदरम्यान त्यांनी मास्क लावला नव्हता, शिवाय ते धूम्रपानही करत होते. त्याचवेळेस रो-रोच्या व्यवस्थापनाकडून सूचना देण्यात आली आणि ही सूचना कानावर पडताच राज ठाकरे यांना त्यांची चूक उमगली. त्यामुळे राज ठाकरे यांना १००० रुपयांचा दंडही ठोठावला गेला. अशा आशयाची बातमी अनेक वृत्तसंस्थांनी दिली. मात्र ही बातमी धादांत खोटी आणि खोडसाळ प्रवृत्तीची असल्याचं नितीन सरदेसाईंनी म्हटलंय. 

नितीन सरदेसाईंनी आपली नाराजी व्यक्त करत म्हटलंय कि, पत्रकारतेच्या संकेतानुसार कुठलीही बातमी देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीकडून त्या बातमीची खातरजमा केली जाते. कुठलाही पुरावा नसताना तसेच संबंधितांकडून कुठलीही शाहनिशा न करता केवळ ऐकीव माहितीवर आधारित अशा प्रकारची चुकीची बातमी छापणे आपल्यासारख्या मान्यवर समूहाकडून अपेक्षित नाही. असं म्हणत त्यांनी या बातमीचा ठळक खुलासा करण्यास सांगितले आहे.  

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा