मध्यप्रदेश : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलिनीकरण आणि शाखांचे बंद होण्यामुळे मागील ५ वर्षांमध्ये २६ सरकारी बँकाच्या अनेक शाखा बंद झाल्या आहेत. यातील मोठी गोष्ट म्हणजे ७५ टक्के शाखा या एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आहेत. या कालावधीमध्ये एसबीआयमध्ये ५ सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेचे विलिनीकरण झाले.
आरटीआय अंतर्गत खुलासा झाला आहे की, मागील ५ वर्षांमध्ये २६ सरकारी बँकांच्या ३४२७ शाखांचे एक तर विलिनीकरण झाले अथवा त्या बंद झाल्या आहेत.
सध्या १० सरकारी बँकांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. आरबीआयने आरटीआयला उत्तर देताने सांगितले की, २६ सरकारी बँकांच्या आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये ९० शाखा, २०१५-१६ मध्ये १२६ शाखा , २०१६-१७ मध्ये २५३ शाखा , २०१७-१८ मध्ये २०८३ शाखा तर २९१८-१९ या आर्थिक वर्षात ८७५ शाखा बंद करण्यात आल्या आहेत अथवा त्यांचे विलिनीकरण करण्यात आले आहे.
मध्यप्रदेशमधील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मागितली होती. यात माहिती मिळाली की, मागील ५ आर्थिक वर्षात विलिनीकरण आणि बंद झाल्यामुळे एसबीआयच्या २५६८ बँक शाखांवर परिणाम झाला आहे. शाखांना का बंद करण्यात आले याचे उत्तर मात्र देण्यात आले नाही.
याबाबत सार्वजनिक बँकेचे कर्मचारी संघटन अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाचे महासचिव सीएच वेंकटचलम म्हणाले की, जर सरकारने १० बँकांचे विलिनिकरण करून ४ मोठ्या बँका बनविण्याचा निर्णय घेतला, तर याचा कमीत कमी ७००० शाखांवर परिणाम होईल.