लोणी काळभोर २३ सप्टेंबर २०२० :जगावर आलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक जणांचे प्राण गेले असून सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा त्यात समावेश आहे. भारतात या महाभयंकर महामारीमुळे कित्येक नागरिकांना याचा फटका बसला असून आणि विविध क्षेत्रातील लोक आपल्या जिवावर उदार होऊन अनेकांना मदत देखील करत आहेत. त्यात डॉक्टरांचे योगदान सर्वात मोठे आहे.
तसेच कित्येक डॉक्टरांचा बळीसुद्धा गेला आहे त्यात काहीजण समाजविरोधी कामे देखील करत असून ,असाच एक अनुभव लोणी काळभोर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आला आहे. कोयत्याचा धाक दाखवून , ” तुम्ही यापुढे या दवाखान्यात काम करायचे नाही ” अशी धमकी देऊन शिवीगाळ दमदाटी करणाऱ्या व शासकीय कामात अडथळा आणल्या कारणावरून एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर जनार्दन जाधव वय ५५ रा. लोणी काळभोर ता. हवेली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन बाळू पाटोळे, रा. लोणी काळभोर याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास डॉक्टर जाधव हे प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर येथे पेशंट तपासत असताना तेथे पाटोळे आला, ” तुम्हला लई माज आला आहे यापुढे तुम्ही या दवाखान्यामध्ये काम करायचे नाही ” असे म्हणून शिवीगाळ, व दमदाटी, करू लागला त्यावेळी जाधव यांनी त्यास तू कोण आहेस? काय काम आहे? असे विचारले व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी रवि शिवपुरे यांनी त्याला समजावून सांगत असताना तो पुन्हा डॉक्टरांना, “तुला मी या दवाखान्यात यायचे नाही असे सांगितले आहे.” असे म्हणाला व त्यानंतर त्यांनी त्याच्या शर्टमध्ये पाठीमागच्या बाजूस लपविलेला लोखंडी धारदार कोयता बाहेर काढून आता तुला सोडणार नाही असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी त्यांनी केली.
तेव्हा तेथे असलेल्या लोकांनी त्यांच्याकडून कोयता काढून घेतला व त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले व पुढील कारवाई लोणी काळभोर पोलीस स्टेशन करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे