नवी दिल्ली, २३ सप्टेंबर २०२०: संयुक्त राष्ट्र महासभेत तुर्कीनं पुन्हा जम्मू-काश्मीरचा मुद्दा मंगळवारी उपस्थित केलाय. तुर्कीचे अध्यक्ष रेचेप तैय्यप एर्दोवान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सांगितलं की, काश्मीर अजूनही ज्वलंत मुद्दा आहे. यावर भारतानं तीव्र आक्षेप नोंदविलाय.
तुर्कीचे अध्यक्ष एर्दोवन यांच्या भाषणात काश्मीरच्या उल्लेखास संयुक्त राष्ट्रामध्ये भारतीय राजदूत टीएस त्रिमूर्ती यांनी आक्षेप घेतलाय. त्रिमूर्ती म्हणाले, आम्ही भारत शासित प्रदेश, जम्मू-काश्मीरच्या संदर्भात तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची टिप्पणी पाहिली आहे. हे थेट भारताच्या अंतर्गत कामकाजात हस्तक्षेप करते आणि पूर्णपणे अस्विकार्य आहे. तुर्कीनं इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करायला शिकलं पाहिजे आणि त्यांच्या धोरणांमध्येही अधिक गंभीरपणे प्रदर्शित केलं पाहिजे.
यूएन जनरल असेंब्लीच्या बैठकीच्या दुसर्या दिवशी तुर्कीचे अध्यक्ष म्हणाले, “काश्मीर वाद दक्षिण आशियातील शांतता आणि स्थिरता यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अजूनही एक ज्वलंत विषय आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर जी पावलं उचलली गेली, त्यांच्याबरोबर ही समस्या अधिक जटिल बनली आहे. ”
तुर्कीचे अध्यक्ष म्हणाले, “आम्ही काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या अखत्यारीत सोडविण्याच्या बाजूनं आहोत, विशेषत: काश्मीरच्या लोकांच्या अपेक्षेनुसार ते असायला हवं.” एर्दोवान म्हणाले की काश्मीर प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडविला पाहिजे.
यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनीही काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांच्या कामगिरीचं कौतुक केलं पण, त्यातील ‘त्रुटी व अपयश’ याचा उल्लेखही केला. कुरेशी म्हणाले, “ही संघटना तितकीच चांगली आहे जशी सदस्य देशांना ही बघावीशी वाटते. जम्मू-काश्मीर आणि पॅलेस्टाईनचा मुद्दा संयुक्त राष्ट्रातील सर्वात प्रदीर्घ वाद आहे. जम्मू-काश्मीरचे लोक अजूनही प्रतीक्षेत आहेत की संयुक्त राष्ट्र त्यांना स्व निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देईल.
गेल्या वर्षीही तुर्कीचे अध्यक्ष एर्दोवन यांनी काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत उपस्थित केला आणि ते म्हणाले की संयुक्त राष्ट्र संघटनेच्या प्रस्तावांच्या असूनही ८० लाख लोक काश्मीरमध्ये अडकले आहेत. काश्मिर वादाकडं लक्ष न दिल्याबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायावर एर्दोआन यांनी टीका केली. एर्दोवनसमवेत मलेशियाचे तत्कालीन पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनीही पाकिस्तानला समर्थन देत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे