त्यानंतर मुंबईप्रेम उफाळून येईल – आमदार प्रताप सरनाईक

मुंबई, २५ सप्टेंबर २०२०: बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून आता राजकारण तापलं आहे. गेली अनेक दिवसांपासून सुशांत सिंह राजपूतच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र विरुद्ध बिहार असं वातावरण तयार झालं होतं. त्यामुळे ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यात वाकयुद्ध सुरु आहे. यावरूनच शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार यांनी नाव न घेता बिहार सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. 

काय म्हणाले प्रताप सरनाईक?

प्रताप सरनाईक यांनी ट्विटरद्वारे बिहार सरकार आणि भाजपवर नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले कि, ”बिहारच्या निवडणुकीचा निकाल, सुशांत सिंग केसचा निकाल व एनसीबी चा अहवाल 10 नोव्हेंबरला जाहीर होणार. तसेच अमेरिकेतील निवडणुका व कोविडची लस आहेच. त्यानंतर मात्र मुंबई वरचे प्रेम उफाळून येईल. तोपर्यंत ज्या व्यक्तींवर, कलाकारांवर आरोप होतील त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.”

बिहार निवडणूक आणि महाराष्ट्र कनेक्शन

बिहारमध्ये जातीय राजकारणाला मोठा वाव आहे. मुंबईत मृत्यू झालेला सुशांत सिंग राजपूत हा मूळचा बिहारचा होता. त्यामुळे बिहार सरकारने महाराष्ट्र सरकारवर अनेक आरोप केले. त्यासोबतच महाराष्ट्रात विरोधी बाकावर बसलेल्या भाजपनेही सुशांतच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला घेरले होते. मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या कंगनाला केंद्रीय गृहमंत्र्यांनी वाय प्लस सुरक्षा देऊ केली. सध्या बिहारमध्ये सुशांतच्या मृत्यूला निवडणुकीचा मुद्दा बनवून मोठं राजकारण सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रात घडलेल्या घटनांचा बिहार निवडणुकीत वापर करून घेण्याचा प्रयत्न बिहारी राजकारणी करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून बॉलीवूडच्या कलाकारांचे चौकशीसत्र सुरूच आहे. यात नव्याने ड्रॅग कनेक्शन समोर आलंय. ज्यात अनेक बड्या कलाकारांची नावं आल्यानं राजकारण खळबळ उडाली आहे. मात्र या सगळ्यात मराठी माणूस, महाराष्ट्र आणि मुबईला बदनाम केला जात असल्याचा आरोप ठाकरे सरकारमधील नेत्यांनी केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा