मुंबई, २७ सप्टेंबर २०२०: मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी लोकल ही मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेमध्ये सर्वात मोठी भूमिका पार पाडते. सध्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे मुंबईत केवळ अत्यावश्यक सेवांसाठी लोकल सुरू होत्या. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कामांतील वेळेतील साम्य लक्षात घेता लोकलमध्ये गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
सध्या राज्यात लॉकडाऊन हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्या अंतर्गतच सर्व काम कर देखील आता सुरू करण्यात आला आहे. हे पाहता मुंबईमध्ये नुकतेच सहकारी आणि खाजगी बँक कर्मचाऱ्यांनाही लोकल ट्रेननं प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलीय. पण, कर्मचाऱ्यांची लोकल ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं निदर्शनास आलंय. याबरोबरच महिला डब्यातही मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळतंय. त्यामुळं पश्चिम रेल्वेनं महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत उद्यापासून म्हणजे २८ सप्टेंबर पासून विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते विरारसाठी विशेष ट्रेन सुरु केली जाणार आहे.
सोमवार २८ सप्टेंबरपासून या लोकल फेऱ्या सुरू होतील. विरार- चर्चगेटसाठी सकाळी ७. ३५ ची लोकल रवाना होणार आहे. तर, संध्याकाळी ६.१० वाजता चर्चगेट- विरार लोकल रवाना होणार आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक प्रवर्गातील कर्मचारी वगळता इतर प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश नसंल. त्यामुळं अन्य कोणीही रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, अशी विनंती पुन्हा एकदा रेल्वेनं केलीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे