बारामती, २८ सप्टेंबर २०२०: बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावानजीक एका विहिरीत माय-लेकरांचा मृतदेह आढळून आला. सोमवारी (दि.२८) सकाळी ही घटना उघडकिस आली. सुषमा प्रमोद लोणकर (वय २७) व वीर (वय ९ महिने) अशी त्यांची नावे आहेत. कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात सतीश राजेंद्र लोणकर यांनी खबर दिली. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येथील शशिकांत शहा यांच्या विहिरीत माय-लेकराचे मृतदेह ग्रामस्थांना आढळून आले. पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार, रविवारी (दि. 11) रात्री अकराच्या सुमारास प्रमोद अशोक लोणकर व पत्नी सुषमा यांच्यात घरातील प्रापंचिक कारणावरून भांडणे झाली होती. त्यामुळे सुषमा या घरातून निघून चालल्या होत्या. त्यांना कुटुंबियांनी थांबवत घरीच झोपवले होते. सोमवारी पहाटे साडे चारच्या सुमारास ती मुलासह घरात नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे या दोघांचा आजूबाजूला शोध घेतला असता गावानजीक चिलाई मंदिराशेजारी एका विहिरीत लहान मुलासह तिचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी भेट दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके अधिक तपास करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल यादव











































